ऐतिहासिक सामन्यापूर्वी क्रिकेटपटूंचे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ ला समर्थन  

ऋतुराज मोगली
Wednesday, 8 July 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊथॅम्प्टन मैदानावरील एजेस बाऊल येथे पहिल्या कसोटी सामन्यास सुरवात झाली आहे.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटानंतर आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊथॅम्प्टन मैदानावरील एजेस बाऊल येथे पहिल्या कसोटी सामन्यास सुरवात झाली आहे. या सामन्यामध्ये खेळ सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर येत ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 

जेसन होल्डर अजूनही जागतिक क्रिकेटमधील सर्वात अंडररेटेड खेळाडू - सचिन तेंडुलकर 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून क्रिकेटच्या स्पर्धा थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आजपासून सुरवात करण्यात आली आहे. क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून ओळख असलेल्या इंग्लंड मधेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेस आज सुरवात झाली. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातील खेळाच्या सुरवातीला दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर येत पायाच्या एका गुडघ्यावर बसत वर्णभेदाविरुद्धच्या लढाईला समर्थन दिले आहे. तत्पूर्वी या मालिकेमध्ये वेस्ट इंडिज संघाच्या क्रिकेटपटूंनी वर्णद्वेषाविरुद्धच्या लढाईला समर्थन देण्यासाठी म्हणून ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हा लोगो असलेला जर्सी परिधान करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही वर्णभेदाविरुद्धच्या लढाईसाठी  सकारात्मक भूमिका घेणार असल्याचेही म्हटले होते.

BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज 

दरम्यान, अमेरिकेत जॉर्ज फ्लाइड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मिनियापोलीस शहरातील एका श्वेत पोलीस अधिकाऱ्याच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात वर्णभेदाविरुद्ध ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाला क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे. तर क्रिकेट जगतातील डॅरेन सॅमी, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी आपल्यासोबत घडलेल्या वर्णभेदाच्या आठवणी देखील जगासमोर ठेवल्या होत्या. यापूर्वी युरोप मध्ये देखील फुटबॉलच्या सामन्यांना सुरवात झाल्यानंतर काही खेळाडूंनी पुढे येत वर्णभेदाविरुद्ध जगभर सुरु झालेल्या  ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. कोरोनानंतर वेलेंसियाच्या खेळाडूंनी फुटबॉलच्या सरावाला प्रारंभ करताना एका गुडघ्यावर बसत, एक हात वर करत  ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलनाला समर्थन दिले होते. त्यानंतर स्पॅनिश फुटबॉल लीगच्या 'ला लीग' स्पर्धेत देखील अनेक खेळाडूंनी वर्णभेदाविरुद्ध सुरु असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.                 

 


​ ​

संबंधित बातम्या