युवी पुन्हा करणार कमबॅक ; पंजाबकडून उतरणार मैदानात 

टीम ई-सकाळ
Wednesday, 9 September 2020

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. युवराज सिंग भारतीय क्रिकेट संघाच्या 'ब्लु जर्सी' मध्ये किंवा रणजी सामन्यांमध्ये खेळणार नसून, फक्त पंजाबसाठी टी -20 सामन्यांमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे समजते. पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराज सिंगला विनंती केल्यानंतर त्याने एक वर्षानंतर पुन्हा मैदानात येण्याचा निर्णय घेतला आहे.    

सेरेना विल्यम्स, डॉमिनिक थिम व मेदवेदेव यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

युवराज सिंगने मागील वर्षी जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. मात्र त्यानंतर युवराज सिंगने कॅनडा मधील ग्लोबल टी -20 स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पण आता जगभरात अन्य देशांतर्गत होणाऱ्या फ्रँचायझी आधारित लीगमध्ये खेळणे सुरू ठेवायचे आहे. आणि त्यासाठी युवराजला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याच बरोबर पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) चे सचिव पुनीत बाली यांनी केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष करू शकत नसल्याचे युवराज सिंगने म्हटले आहे. तसेच पंजाबच्या संघाला चॅम्पियनशिप जिंकण्यास मदत करण्याची प्रेरणा असल्याचे युवीने म्हटले असून, त्याने आणि भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने अनेक टूर्नामेंट जिंकल्या असल्या तरी, पंजाबसाठी मात्र एकत्र येऊन कोणतीच कामगिरी केली नसल्याचे युवराजने नमूद केले. 

2011 च्या विश्वचषक स्पर्धेत प्लेअर ऑफ दी टूर्नामेंट राहिलेल्या युवराजने गेल्या जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर पीसीएचे सचिव पुनीत बाली यांनी 38 वर्षीय युवराजकडे पंजाब क्रिकेटच्या फायद्यासाठी निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे युवराजने टी -20 प्रकारात राज्याच्या संघात पुन्हा परतण्याचे मान्य केले आहे. 

आता फ्रान्सच्या फुटबॉल संघातील 'या' खेळाडूला कोरोनाचा संसर्ग  

दरम्यान, 10 जून 2019 रोजी युवराजने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. तर युवराज सध्या शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग यांच्यासोबत अन्य युवा खेळाडूंना पंजाब क्रिकेटच्या स्टेडिअमवर मार्गदर्शन करत आहे. शिवाय यावेळेस युवराजने नेट मध्ये फलंदाजीचा सराव केला. तर  युवराज सिंग ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीग (BBL) लीगमधून मैदानात उतरण्याच्या तयारीला लागला असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. युवीच्या नावे 304 वनडेमध्ये 8701 धावा आणि 111 विकेट आहेत. त्याने 40 कसोटीसह 58 टी 20 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.     


​ ​

संबंधित बातम्या