सिक्सर किंग पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 September 2020

सिडनी मॉर्निग हेरॉल्डने युवराज सिंगचे मॅनेजर जेसन वॉर्न यांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया युवीसाठी बीग बॅश लीगमध्ये संघ शोधत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंग ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीग (BBL) लीगमधून मैदानात उतरण्याच्या तयारीला लागला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यासाठी संघ शोधत असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयशी संलग्नित असताना ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या लीगमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत भारतीय पुरुष संघातील कोणताही खेळाडू ऑस्ट्रेलियन लीगमध्ये खेळलेला नाही. 

IPL 2020 : रैना-भज्जीशिवाय सलामीच्या सामन्यात कसा असेल धोनीचा प्लेइंग इलेव्हन

सिडनी मॉर्निग हेरॉल्डने युवराज सिंगचे मॅनेजर जेसन वॉर्न यांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया युवीसाठी बीग बॅश लीगमध्ये संघ शोधत आहे. 2007 मधील टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या विश्वचषकात युवीने लक्षवेधी खेळ केला होता. 2017 मध्ये युवी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर 2019 मध्ये भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळत असताना युवीने निवृत्तीची घोषणा केली होती. 
युवीच्या नावे 304 वनडेमध्ये 8701 धावा आणि 111 विकेट आहेत.  त्याने 40 कसोटीसह 58 टी 20 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. बीबीएल क्लब त्याला संघात सामील करुन घेण्यासाठी म्हणावी तशी उत्सुकता दाखवत नसल्याचेही चित्र आहे. 

UAE त रंगणाऱ्या IPL चं संपूर्ण वेळापत्रक, आबूधाबीच्या मैदानात रंगणार सलमीचा सामना​

आस्ट्रेलिया क्रिकेटर्स संघाचे अध्यक्ष आणि आयपीएलमध्ये चेन्नईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेन वॉटसन यांनी भारतीय क्रिकेटर्सचा बीबीएलमध्ये सहभाग फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केलाय. जे भारताकडून खेळत नाहीत पण टी-20 मध्ये लक्षवेधी खेळ करण्याची क्षमता असणारे अनेक प्रतिभावंत खेळाडू बीबीएल तसेच जगभरातील अन्य लीगसाठी उपलब्ध होऊ शकतील, असे वॉटसन यांनी म्हटले आहे.   37 वर्षीय युवराजने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या निर्णयानंतर त्याचा इतर लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  
 


​ ​

संबंधित बातम्या