Video : रडीचा डाव! डिकॉकनं फखर झमानला गंडवलं; काय सांगतो नियम?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 5 April 2021

300+ धावांचा पाठलाग करताना फखर झमानने एकट्याने निम्म्यापेक्षा अधिक धावा केल्या. त्याला एकाही फलंदाजाने साथ दिली नाही.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी पराभूत केले. या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीये. या सामन्यात 300+ धावांचा पाठलाग करताना फखर झमानने एकट्याने निम्म्यापेक्षा अधिक धावा केल्या. त्याला एकाही फलंदाजाने साथ दिली नाही. अखेरच्या षटकात पाकिस्तानी संघाचा विजय आवाक्याबाहेर होता. पण फखर झमानकडे आठ धावा करुन वनडे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकवण्याची संधी होती. 

अखेरच्या षटकात स्ट्राइक देखील फखर झमानकडे होते. पण दोन धावा घेण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. ज्या पद्धतीने तो धावबाद झाला त्यावरुन सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. क्विंटन डिकॉकची चलाखी खिलाडूवृत्तीला बगल देऊन फखर झमानला गंडवणारी असल्याची चर्चा सुरु आहे. फखर झमान दुसरी धाव घेत असताना यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकने चेंडू नॉन स्ट्राईकला फेकण्याचा इशारा केला. यावेळी फखर झमान थोडा रिलॅक्समूडमध्ये केला. लॉगऑफला उभ्या असलेल्या मर्करमने चेंडू स्टाईक एन्डला फेकल्याचे लक्षात आल्यानंतर फखर झमान याने पिकअप घेतला पण तो आपली विकेट वाचवू शकला नाही. तो 155 चेंडूत 193 धावा करुन माघारी फिरला. अवघ्या 7 धावांनी त्याचे द्विशतक हुकले. 

RSAvsPAK : झमानचं द्विशतक हुकलं; दक्षिण आफ्रिकेनं पाकला रोखलं

क्विंटन डिकॉकची कृती अयोग्य आहे का? 

द मॅरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या 41.5.1 नियमानुसार, इशारा किंवा शाब्दिक स्वरुपात स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूचे लक्षविचलित करणे हा अडथळा मानला जोतो. फिल्डरकडून केलेले हे कृत्य अखिलाडूवृत्तीचे मानले जाते.  
 

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसी नियमावलीतील क्लॉज 41 नुसार,  स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूचे लक्ष विचलित करणे अखिलाडूवृत्ती मानले जाते. कसोटी, वनडे आणि टी-20 सर्वच प्रकारात अशी कृती करणे अयोग्य आहे. 

फेक फिल्डिंगवर भुर्दंड सोसावा लागतो का? 

क्रिकेटच्या मैदानातील अशा प्रकारच्या कृत्यानंतर फेक फिल्डिंग करणाऱ्या संघाला 5 धावांची पेनल्टीची तरतूद आहे. मैदानातील अंपायर्संना यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहेत.  

यापूर्वी असा प्रकार घडला आहे का?

2019 मधील अ‍ॅशेस मालिकेत पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडच्या जॉनी बेयरस्ट्रोने स्टिव्ह स्मिथला अशाच पद्धतीने बाद केले होते. यावेळी मैदानातील अंपायर्स मॅरेस इरास्मस आणि कुमार धर्मसेना यांनी ऑस्ट्रेलिला 5 धावा दिल्या आहेत.  

 


​ ​

संबंधित बातम्या