मिताली राजने साकारला भारताचा चमकदार विजय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात दीप्ती शर्माने इंग्लंडची धावसंख्या आवाक्यात ठेवली. त्यानंतर स्मृती मानधनाने भक्कम सुरुवात करून दिल्यानंतर मिताली राज आणि स्नेह राणा यांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय क्रिकेट लढतीत भारताचा विजय निश्चित केला.

ब्रिस्टॉल - पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात दीप्ती शर्माने इंग्लंडची धावसंख्या आवाक्यात ठेवली. त्यानंतर स्मृती मानधनाने भक्कम सुरुवात करून दिल्यानंतर मिताली राज आणि स्नेह राणा यांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय क्रिकेट लढतीत भारताचा विजय निश्चित केला. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमासह मितालीने भारताच्या विजयाचा ठसा उमटवला.

अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना मितालीने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत भारतास विजयी केले. तिच्या नाबाद पाऊण शतकामुळे भारताने चार विकेट आणि तीन चेंडू राखून विजय मिळवला. या ४७ षटकांच्या लढतीत भारतास विजयासाठी अखेरच्या ३० चेंडूंत ३८ धावांची गरज होती. या वेळी स्नेह राणाने धावगतीस वेग दिला. 

एक बाजू भक्कम लावून धरलेल्या मितालीने हरमनप्रीत आणि स्नेहसह ५० तसेच दीप्ती शर्मासह ३३ धावा जोडल्या. स्मृतीने धावांचा पाठलाग करताना असलेले आपले कौशल्य पुन्हा दाखवताना भारत षटकामागे ४ धावांची गती राखेल, याची खबरदारी घेतली होती. स्मृती परतली, त्या वेळी भारताच्या ८१ धावा होत्या. त्यातील ४९ स्मृतीच्या होत्या.

इंग्लंडला ३ बाद १५१ वरून २१९ धावांत रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरल्या. दीप्ती शर्माने तीन विकेट घेतल्या; तसेच तिला सहकारी गोलंदाजांची चांगली साथ लाभली. इंग्लंडच्या अखेरच्या जोडीने १३ चेंडूंत २२ धावा करीत भारतासमोरील लक्ष्य वाढवले होते.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड महिला - ४७ षटकात २१९ (लॉरेन विनफिल्ड-हिल ३६ - ५२ चेंडूंत ५ चौकार, हिथर नाईट ४६ - ७१ चेंडूत ४ चौकार, नैटली सीवर ४९ - ५९ चेंडूत  ५ चौकार, सोफिया डंकली २८, केट क्रॉस नाबाद १६, झुलन गोस्वामी ३१-१, शिखा पांडे ४२-१, दीप्ती शर्मा १०-०-४७-३, पूनम यादव ४३-१, स्नेह राणा ३१-१, २४-१)

पराजित वि. भारतीय महिला - ४६.३ षटकात ६ बाद २२० (शेफाली वर्मा १९ - २९ चेंडूत ३ चौकार, स्मृती मानधना ४९ - ५७ चेंडूत ८ चौकार, जेमिमाह रॉड्रिग्स ४ - २१ चेंडू, मिताली राज नाबाद ७५ - ८६ चेंडूत ८ चौकार, हरमनप्रीत कौर १६ - ३८ चेंडू, दीप्ती शर्मा १८ - २५ चेंडूत १ चौकार, स्नेह राणा २४ - २२ चेंडूत ३ चौकार, झुलन गोस्वामी नाबाद १, अवांतर - १४ - ९ वाईडसह,  केट क्रॉस ३८-१, सोफी एकलस्टन १०-२-३६-२)

भारताचा प्रभाव

  • धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांचा गेल्या १२ पैकी ११ सामन्यांत विजय
  • भारतीय संघ धावांचा पाठलाग करीत असताना स्मृती मानधनाने गेल्या दहा सामन्यात अर्धशतक केले होते, यावेळी तिचे अर्धशतक एका धावेने हुकले
  • इंग्लंडने मायदेशातील भारताविरुद्धची सलग सहावी एकदिवसीय मालिका जिंकली.

​ ​

संबंधित बातम्या