कोहली भडकला... लढण्याची जिगर दाखवणाऱ्या खेळाडूंनाच प्राधान्य देणार!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 June 2021

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील हार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या जिव्हारी लागली आहे. पुढच्या काळात संघात बदलाचे संकेत त्याने दिले. झोकून देणारी कामगिरी करण्याची मानसिकता असलेल्या योग्य खेळाडूंना संघाची नव्याने रचना करताना संधी दिली जाईल.

साऊदम्टन - कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील हार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या जिव्हारी लागली आहे. पुढच्या काळात संघात बदलाचे संकेत त्याने दिले. झोकून देणारी कामगिरी करण्याची मानसिकता असलेल्या योग्य खेळाडूंना संघाची नव्याने रचना करताना संधी दिली जाईल, अशा शब्दांत त्याने कामगिरीपेक्षा मानसिकतेत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना इशारा दिला. 

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी दोन्ही डावांत निराशा केली. दुसऱ्या डावात तर लढण्याची जिगर दाखवण्यात काही फलंदाज कमी पडले. कोहलीने ही बाब अधोरेखित केली. त्याने जाहीरपणे कोणाचे नाव घेतले नाही, पण काही खेळाडूंचा हेतूच कमजोर होता असे त्याचे म्हणणे आहे.

भक्कम बचावासाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराने पहिल्या डावात ५४ चेंडूत ८ धावा करताना पहिली धाव काढण्यासाठी तब्बल ३५ चेंडू घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ८० चेंडूत १५ धावाच केल्या होत्या. आम्ही सर्व बाबींचे पुनर्मूल्यांकन करणार आहोत आणि संघ पुन्हा ताकदवान करण्यासाठी काय बदल करावे लागतील याचीही चर्चा करत राहणार आहोत. त्याच त्याच चुका पुन्हा करणार नाही, असे विराटने सांगितले. अशा बदलांसाठी किंवा तयारीसाठी वर्षाचा काळ घालवणार नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दुसऱ्या फळीचा संघ तयार झाला आहे. यातून आपली क्षमता सिद्ध होते. आता असाच विचार कसोटी संघातही बदल करताना केला जाईल, असे विराट म्हणाला.

सामन्याच्या स्थितीनुसार खेळ करावा लागेल
न्यूझीलंडसारख्या ताकदवान गोलंदाजीसमोर धावा कशा करायच्या याचाही मार्ग शोधावा लागेल, यासाठी योग्य प्लानिंग करावे लागेल. सामन्याच्या स्थितीनुसार खेळ करताना सामना हातून निसटला जाणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. यात काही तांत्रित अडचणी असतील असे मला वाटत नाही. सामन्याची सद्यपरिस्थितीही ओळखण्याची चतुरता असायला हवी. असे सांगताना विराटचा रोख पुजाराकडे असल्याचे संकेत मिळाले.


​ ​

संबंधित बातम्या