आई, बहिणीच्या निधनाने उद्ध्वस्त झाले; वेदा कृष्णमूर्तीची भावना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 June 2021

दोन आठवड्यांच्या अंतराने वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले. हे दुःख बाजूला ठेवून वेदा भारतीय महिला क्रिकेट संघासोबत इंग्लंडला रवाना होत आहे. आम्ही उद्ध्वस्त झालो होतो.

नवी दिल्ली - दोन आठवड्यांच्या अंतराने वेदा कृष्णमूर्तीची आई आणि बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले. हे दुःख बाजूला ठेवून वेदा भारतीय महिला क्रिकेट संघासोबत इंग्लंडला रवाना होत आहे. आम्ही उद्ध्वस्त झालो होतो. त्यावेळी मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी साह्य महत्त्वाचे असते, असे तिने सांगितले. 

वेदाच्या कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तिच्या आई आणि बहिणीचे पंधरा दिवसांच्या अंतराने निधन झाले. “नशीब तुमच्यासाठी काहीतरी ठरवत असते, यावर माझा विश्वास बसला आहे. माझी बहीण तरी रुग्णालयातून घरी परत येईल असे मला वाटत होते, पण ती आलीच नाही आणि मी पूर्ण उद्ध्वस्त झाले,‘‘ असे तिने सांगितले. 

आतून पूर्ण खचल्यावरही मी चेहऱ्यावर धैर्य आणले होते. त्या परिस्थितीला जाणे सोपे नव्हते. दुःखातून बाहेर कसे पडता येईल, त्यातून कसे सावरता येईल, हे शिकायला हवे होते. पण ते विसरले जात नाही हेही तितकेच खरे आहे, असे वेदा म्हणाली. वेदा सोडल्यास तिच्या कुटुंबातील प्रत्येकास कोरोनाची लागण झाली. त्या सर्वांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान तिच्यासमोर होते.  

अनेकांना डॉक्टरांचा सल्ला मिळवण्यासाठीही प्रयास पडत होते. त्यावेळीच मला महामारीस सामोरे जाण्यासाठी मन कणखर असायला हवे याची जाणीव झाली. माझी मोठी बहीण वत्सला हिला निधनापूर्वी हाच त्रास झाला होता. 

दुःखातून जात असताना ज्यांनी मला कॉल केला नाही किंवा काही मेसेज केला नाही, त्यांच्यावर मी नाराज नाही. माझी विचारपूस केलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानले. भारतीय मंडळाच्या सचिवांचा फोन आल्यावर मला धक्का बसला. ते कॉल करतील असे मला वाटले नव्हते. 
- वेदा कृष्णमूर्ती


​ ​

संबंधित बातम्या