कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याअगोदर टीम इंडियाची कसरत

पीटीआय
Sunday, 9 May 2021

न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाला एकूण १८ दिवसांच्या विलगीकरणाचा अडथळा पार करावा लागणार आहे.

नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाला एकूण १८ दिवसांच्या विलगीकरणाचा अडथळा पार करावा लागणार आहे. आठ दिवस भारतात जैवसुरक्षा वातावरण आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये पोहचताच १० दिवसांचे विलगीकरण असे हे दोन टप्पे आहेत.

हा कसोटी अजिंक्यपदाचा सामना १८ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठीची प्रक्रिया टीम इंडियाला २५ मेपासून सुरू करावी लागणार आहे. सर्व खेळाडू एकत्र येऊन त्यांना आठ दिवसांसाठी जैवसुरक्षा वातावरणात ठेवण्यात येईल. लंडनमधील दहा दिवसांचे विलगीकरण दोन टप्प्यात करण्याचा विचार आहे. त्यामुळे खेळाडू २ जूननंतर सराव करू शकतील, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

२ जूनला लंडनला पोहचल्यावर १० दिवस त्यांना लंडनच्या विलगीकरणाचे नियम पाळावे लागतील, परंतु भारतातील जैव सुरक्षा वातावरणातून चार्टड विमान आणि या सुरक्षित प्रवासातून थेट लंडनमध्ये त्यांच्या जैवसुरक्षा वातावरणात खेळाडू प्रवेश करणार असल्यामुळे काही दिवसांनंतर त्यांना सराव करता येईल.

कुटुंबाला सोबत नेणार
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यात भारताचा अखेरचा पाचवा कसोटी सामना १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. भारतीय खेळाडू जवळपास तीन महिने इंग्लंडमध्ये असणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना कुटुंबाला सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ तीन महिन्यांचाच हा दौरा नसून कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना जवळपास दीड महिन्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे कुटुंबाला सोबत नेता येणार आहे, परंतु कोणालाही बाहेर फिरता येणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या