कोरोनामुळे भारतातील टी-२० वर्ल्डकप अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 May 2021

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे अधांतरी आहे; मात्र भारताच्या शेजारील बांगलादेशमध्ये जाऊन इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश स्पर्धेच्या तयारीसाठी मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहेत.

तयारीसाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मात्र बांगलादेशामध्ये मालिका खेळणार
नवी दिल्ली/ ढाका - भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे अधांतरी आहे; मात्र भारताच्या शेजारील बांगलादेशमध्ये जाऊन इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश स्पर्धेच्या तयारीसाठी मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहेत.

कोरोनाने भारतात उग्र रूप धारण केले आहे. दिवसागणिक तीन लाखांची संख्या आता दोन लाखांच्या आसपास आली आहे तरी संकट कायम आहे. आयपीएल खेळाडू बाधित झाल्यामुळे आयपीएल स्थगित करावी लागली. एकूणच भारतातील या परिस्थितीमुळे विश्वकरंडक स्पर्धेच्या संयोजनाचे भवितव्य कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा अमिरातीत खेळवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आयपीएलच्या अनुभवामुळे काही परदेशी खेळाडूंनी आतापासूनच भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पण त्याच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे संघ बांगलादेशमधील मालिका निश्चित करत आहेत.

ऑस्ट्रेलिया तीनऐवजी पाच सामने खेळणार
ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून करणार आहे. पूर्वनियोजित तीन सामन्यांच्या मालिकेऐवजी आता ते पाच सामने खेळणार आहेत. ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हा त्यांचा पहिलाच बांगलादेश दौरा असणार आहे.

कोणत्याही प्रकारच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत तीनदाच बांगलादेशच्या दौऱ्यावर गेलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा २४ जुलै रोजी संपत आहे, यात ते पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. त्यानंतर ते लगेचच बांगला देशला प्रयाण करणार आहेत.

ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशमध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघही बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सर्व मालिका वर्ल्डकप तयारीसाठी असणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या