BCCIच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नटराजन का नाही; जाणून घ्या कारण

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या टी नटराजनचे मात्र नाव बीसीसीआयच्या नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिसत नाही.

भारतीय क्रिकेट मंडळाने  (BCCI) 28 खेळाडूंसोबतच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा केली. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना A+ श्रेणीतील स्थान कायम ठेवले. बीसीसीआयने जाहीर केलेल्या 28 खेळाडूंच्या यादीत काही नवोदित खेळाडूंची नावे आली आहेत तर संघातून डच्चू मिळालेल्या खेळाडूंना यादीत स्थान मिळालेले नाही.  2020-21 च्या हंगामातील करार यादीतून केदार जाधव आणि मनिष पांड्ये यांना वगळण्यात आले असून मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांना स्थान देण्यात आले आहे. या नवोदित खेळाडूंमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या टी नटराजनचे मात्र नाव बीसीसीआयच्या नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिसत नाही. सध्याच्या घडीला त्याचे नाव नसले तरी तो या यादीत समाविष्ट होऊ शकतो. कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचे नाव नाही याला कारण आहे. 

काय आहे नियमावली?

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टसाठी एक विशेष नियमावली आहे. याची पूर्तता करणाऱ्या खेळाडूलाच वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान देण्यात येत असते. ज्या खेळाडूने राष्ट्रीय संघातून 3 कसोटी, 8 वनडे किंवा 10 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले असेल तरच, त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिले जाते. या तिन्ही प्रकारात नियमित सदस्य असणाऱ्या खेळाडूला A+ ग्रेडमध्ये स्थान मिळते.  

विराट, रोहित, बुमराहला वर्षाला सात कोटींचे पॅकेज;जाणून घ्या कुणाला किती पैसे मिळणार 

नटराजनला स्थान मिळणार का?

टी नटराजन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 1 कसोटी 2 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचा विचार करण्यात आलेला नाही. सध्याच्या घडीला त्याला या यादीत नाव मिळाले नसले तरी, त्याच्या नावाचा समावेश होऊ शकतो. यंदाच्या हंगामात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यात नटराजनला संघात स्थान मिळाले तर त्याचे नाव कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये येऊ शकते. याशिवाय सप्टेंबरपर्यंत नटराजनने 6 वनडे किंवा 6 कसोटी सामने खेळले तरीही तो बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये दिसू शकतो. 

केदार जाधव, मनिष पांड्येला बीसीसीआयचा धक्का; घेतला मोठा निर्णय

लिस्टमध्ये नसलेल्यांना कसे पैसे मिळतात?

जे खेळाडू बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये नसतात पण, काही मोजके सामने खेळतात त्यांना प्रो रेटा बेसवर पैसे मिळत असतात. टी नटराजनसह सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या यासारख्या खेळाडूंना प्रो रेटा बेसवर (सामन्यानुसार) पैसे दिले जातात. नटराजनसह पृथ्वीलाही कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान मिळालेले नाही. मागील हंगामात तो केवळ 1 कसोटी सामना खेळला आहे. दुसरीकडे शुभमन गिलने 3 कसोटी सामने खेळत कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये सामील झालाय.


​ ​

संबंधित बातम्या