लय सापडली होती , पण...: विराट

सुनंदन लेले
Tuesday, 10 August 2021

भारतीय संघाला चांगल्या खेळाची लय नक्कीच सापडली होती. आमच्या गोलंदाजांनी समोरच्या संघाला दोनही डावांत योग्य धावसंख्येत बाद करायची करामत करून दाखवली होती.

भारतीय संघाला चांगल्या खेळाची लय नक्कीच सापडली होती. आमच्या गोलंदाजांनी समोरच्या संघाला दोनही डावांत योग्य धावसंख्येत बाद करायची करामत करून दाखवली होती. पहिल्या डावात आम्हाला चांगली आघाडी मिळाली होती आणि चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय फलंदाजांनी ५० धावांच्या पुढची मजल मारली होती. या सगळ्याच गोष्टी मला खूप सकारात्मक वाटतात. सामन्यात भारतीय संघाचा वरचष्मा होता हे मान्य करावे लागेल. पावसाने घोळ घातला नसता तर मालिकेत १-० आघाडी घेण्याची संधी आम्हाला जास्त होती’’, असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने मांडले.

मिळालेल्या संधीचे सोने करणाऱ्या के एल राहुलनेही पहिल्या सामन्यातील सर्वांगीण खेळाबद्दल समाधान व्यक्त केले. ‘इंग्लंडमध्ये खेळणे आव्हानात्मक असते आणि भारतीय संघाला अशी आव्हाने आवडतात. कसोटी क्रिकेटपासून कधी खराब फॉर्म; तर कधी दुखापतीमुळे मला लांब राहावे लागले होते. कसोटी क्रिकेट मनापासून आवडत असल्याने त्याच्यापासून दूर राहणे मला वेदना देणारे होते, असे राहुल म्हणाला.

मला पहिल्या कसोटीत खेळायची संधी मिळाली आणि संघाला चांगल्या स्थितीत नेणारी फलंदाजी मला निदान पहिल्या डावात करता आली हे बरे वाटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना संघात खेळायला मिळाले नाही तरीही मेहनत आणि सरावात कमी पडून चालत नाही. मी मनापासून फलंदाजीचा सराव आणि तंदुरुस्तीवर भर देत होतो, म्हणून संधी मिळाल्यावर खेळायला तयार होतो’, राहुल सांगत होता.

इंग्लंडच्या गोलंदाजांविषयी बोलताना राहुल म्हणाला, ‘जिमी अँडरसनचे गोलंदाजीचे तंत्र अफलातून आहे. तो प्रदीर्घकाळ एका टप्प्यावर चेंडू टाकून दोन्ही बाजूला स्विंग करून फलंदाजाला प्रश्न विचारत राहतो. तसेच अँडरसन सहज फटका मारता येईल असे चेंडू अजिबात टाकत नाही. या सगळ्याचा विचार केला तर भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात उभारलेली धावसंख्या आणि घेतलेली आघाडी मनातला उत्साह वाढवून गेली आहे.’

पहिल्या कसोटी सामन्यातील अजून एक लक्षणीय गोष्ट म्हणजे तळातील भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर तग धरून कमाल केली. ‘आपले गोलंदाज सरावादरम्यान मुद्दाम फलंदाजीचा मन लावून सराव करत आहेत. नॉटिंगहॅम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तळातील फलंदाजांनी खेळपट्टीवर उभे राहण्याची मानसिक तयारी दाखवली ज्याचे कौतुक वाटले. तसेच जसप्रीत बुमराने संपूर्ण सामन्यात गोलंदाजी करताना साधलेला परिणाम खूप आवडला आहे मला’, कौतुक करताना राहुल म्हणाला.

लंडनला पोहोचून एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ लॉर्डस् मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या