अंतिम सामन्याची धास्ती नाही - विराट कोहली

सुनंदन लेले
Friday, 18 June 2021

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची उत्सुकता कमालीची वाढलेली असली, तरी आम्ही अंतिम सामन्याची धास्ती घेणार नाही. प्रत्येक कसोटी सामना आम्ही ज्या ध्येयाने खेळतो तसाच हा एक सामना आहे.

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची उत्सुकता कमालीची वाढलेली असली, तरी आम्ही अंतिम सामन्याची धास्ती घेणार नाही. प्रत्येक कसोटी सामना आम्ही ज्या ध्येयाने खेळतो तसाच हा एक सामना आहे. आम्ही इंग्लंडमध्ये एक नाही तर सहा कसोटी सामने खेळायला या दौऱ्या‍वर आलो आहोत, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंड संघाविरुद्धच्या सामन्याबाबत बोलताना सांगितले.

आम्ही सर्वोत्तमतेच्या ध्यासाने भारलेलो आहोत. संघ एखाद् दुसऱ्या सामन्याचा विचार करत नाही. दोन वर्षांत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना पात्रतेचे निकष बदलत गेले तरीही आम्ही सर्वोत्तम खेळ करून शेवटच्या टप्प्यात दिमाखात आलो आहोत. प्रत्येक खेळाडूला आपापली भूमिका पक्की माहीत आहे. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळणे पसंत करतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेव्हा लोकांना आम्ही सामना बचाव करून अनिर्णित राखला तरी मोठे वाटत होते, तिथे आम्ही भन्नाट खेळ करून विजय संपादून दाखवले. संघातील वातावरण आणि संस्कृती दाखवणारा तो खेळ होता, विराट अभिमानाने म्हणाला.

विल्यमसन चांगला मित्र
विल्यमसन माझा चांगला मित्र आहे. आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे. मैदानाबाहेर आम्ही गप्पा मारतो, पण अर्थातच मैदानात उतरल्यावर चांगले क्रिकेट खेळून कुरघोडी करायला धडपडतो, असे विल्यमसनबद्दल बोलताना विराट म्हणाला.

अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मी इतकेच सांगेन, की आम्ही हा सर्वांत मोठा सामना म्हणून उगाच दडपण घेणार नाही. पाच दिवस चांगले क्रिकेट खेळलो तर योग्य निर्णय आपोआप लागेल. निकालाचा विचार न करता सर्वोत्तम क्रिकेट कसे खेळता येईल याकडे लक्ष द्यायचे आहे, असे विराटने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या