आमचा नाद करायचा नाय...!

सुनंदन लेले
Wednesday, 18 August 2021

आमच्या एका खेळाडूच्या मागे तुम्ही लागलात त्याला काही चुकीचे बोललात, तर मग आम्ही अकराही जण त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे राहू आणि तुमच्या मागे हात धुऊन लागू. हा भारतीय संघ असा आहे.

धगधगत्या क्रिकेटची चुणूक दाखवलेला लॉर्डस् कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत १-० आघाडी घेतली. प्रेक्षकांना कठोर क्रिकेटची धग बाहेर बसून लागत होती, कारण मैदानावर दोन संघांदरम्यान चांगल्याच ठिणग्या उडत होत्या. नवीन जमान्यातील भारतीय संघ ‘आरे ला कारे रे’ करणारा असल्याने खेळाडूंनी दुसऱ्‍या डावात प्रथम इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण करून सोडले आणि मग गोलंदाजी करताना फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.

आमच्या एका खेळाडूच्या मागे तुम्ही लागलात त्याला काही चुकीचे बोललात, तर मग आम्ही अकराही जण त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे राहू आणि तुमच्या मागे हात धुऊन लागू. हा भारतीय संघ असा आहे. जो गोष्टी मान खाली घालून ऐकत नाही. कारण नसताना कोणी डिवचले तर उलट आम्हाला त्यातून प्रेरणा मिळते. मग काय होते काल सगळ्यांना बघायला मिळाले. मला वाटते असाच सामना बघायला प्रेक्षक गर्दी करतात, केएल राहुलचे हे बोलणे सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे.

कशी पडली होती ठिणगी
लॉर्डस् मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी मैदानावर, मैदानाबाहेर बरेच नाट्य घडले. प्रथम विराट कोहली फलंदाजी करताना ओली रॉबिन्सन कुत्सित हसला होता. मग जसप्रीत बुमराला जिमी अँडरसनने टोमणे मारले. फलंदाजी करताना बुमराच्या हेल्मेटवर दोनदा चेंडू लागला. सिराजलाही इंग्लंडचे गोलंदाज सतत काही तरी बोलत होते. भारतीय संघाला नेहमी मान वर करून खेळायला प्रोत्साहित करणारा विराट कोहली मग चांगलाच जागा झाला. त्याने दुसरा डाव घोषित केल्यावर आपल्या गोलंदाजांना इतकेच सांगितले, की ६० षटकांच्या खेळात सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करा आणि समोरच्या फलंदाजांना सुखाने जगू देऊ नका.

काय आहे इतिहास
या बोलण्यामागे भूतकाळातील संदर्भही आहेत. २०१४ मध्ये नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात प्रमुख फलंदाज बाद झाले असताना रवींद्र जडेजाने खंबीर फलंदाजी करून झुंज दिली होती. फलंदाजांना बाद करण्यात उतावळा झालेल्या जिमी अँडरसनने मैदानावर जडेजाला शिवीगाळ केली. नंतर चहापानाला पॅव्हेलियनमध्ये जाताना जडेजाला मागून तरातरा येत मुद्दाम चांगला धक्का दिला. कप्तान महेंद्रसिंग धोनीने झाला प्रकार गांभीर्याने घेत सामना अधिकाऱ्‍यांकडे तक्रार केली होती. अँडरसन अडचणीत सापडला असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केवळ इंग्लंड बोर्ड अधिकाऱ्‍यांबरोबर असलेली मैत्री लक्षात घेऊन तक्रार मागे घ्यायला लावली होती, ज्याचा धोनीला प्रचंड राग आला होता. हा सगळा प्रकार १२-१३ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाअगोदर घडला होता.

सात वर्षांनी पुन्हा तेच...
बरोबर सात वर्षांनी सामना होत असताना त्याच अँडरसनने तीच चूक केली, पण या वेळी भारतीय संघाने सामन्यानंतर नव्हे, तर सामन्यातच जबरदस्त कामगिरीचा दणका देऊन हिशेब चुकते केले. इंग्लंड संघाने भारतीय संघाला अडचणीत टाकायला बरेच प्रयत्न केले. प्रथम चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणे जोडीने किल्ला लढवला. नंतर बुमरा-शमी जोडीने वळवळलेल्या शेपटीचा झटका इंग्लंडच्या गोलंदाजांना दिला. भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी हाती तिरंगा ठेवत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद दाखवून दिला.

लॉर्डस्वरचा विजय संस्मरणीय होता. आम्हा सगळ्यांना कसोटी सामना जिंकायची किती आग होती हेच दिसून आले असेल, पण अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत. तेव्हा हुरळून जाणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे कसोटी विजय साजरा करायला थोडा वेळ आहे, कारण पुढच्या कसोटी सामन्याअगोदर थोडी विश्रांती आहे.
- विराट कोहली


​ ​

संबंधित बातम्या