यशाचा ‘सरळ’ मार्ग - दीपक चहर

सुनंदन लेले
Friday, 23 July 2021

वेगवान गोलंदाज असलात तर चेंडूची शिवण सरळ यायलाच पाहिजे, जेणेकरून चेंडू स्विंग होण्याची शक्यता वाढते. तसेच फलंदाजी करताना जर बॅट सरळ येत असली तर चेंडू बॅटच्या मधोमध लागून चांगला फटका मारण्याची शक्यता वाढते.

वेगवान गोलंदाज असलात तर चेंडूची शिवण सरळ यायलाच पाहिजे, जेणेकरून चेंडू स्विंग होण्याची शक्यता वाढते. तसेच फलंदाजी करताना जर बॅट सरळ येत असली तर चेंडू बॅटच्या मधोमध लागून चांगला फटका मारण्याची शक्यता वाढते. म्हणजेच क्रिकेटमध्ये फलंदाजी असो वा गोलंदाजी सरळ खेळणे सर्वोत्तम असते. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात अडचणीत सापडला असताना ६९ धावांची नाबाद खेळी करून विजय हाती घेणारा दीपक चहर पत्रकारांशी बोलताना म्हणाला.  

‘फलंदाजी मला येते याचा मला विश्वास होता. दडपण वाढले असताना मनासारखा खेळ करता आला याचा आनंद आहे. महेंद्रसिंह धोनीबरोबर खेळून दडपण वाढलेले असताना चुका टाळून कसे खेळायला हवे हे शिकायला मिळाले आहे. डोके शांत ठेवून सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा हे धोनीने शिकविले आहे. मी आणि भुवनेश्वर कुमारने तेच केले दुसऱ्‍या एक दिवसीय सामन्यात. सामना जिंकल्यावर माझे संघातील सगळ्यांनी कौतुक केलेच, इतकेच काय तर फोनवर विराट कोहलीचाही संदेश मला आला, असे चहरने सांगितले.

राहुल द्रविड सरांसोबत मी अगोदरही काही दौरे केले आहेत. त्यांना मी चांगली फलंदाजी करू शकतो याची थोडी कल्पना आहे. त्यांनी मला वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले आहे. म्हणून आदराने आणि प्रेमाने मी म्हणेन की राहुल द्रविड सर नुसते ‘इंदिरा नगरचे गुंडे’ नाहीत तर संपूर्ण भारतीय क्रिकेटचे ‘डॉन’आहेत. मला ७ व्या ८ व्या क्रमांकावर खेळून संघाला गरज असताना उपयुक्त धावा करायचे कसब अजून अंगी बनवायचे आहे, जेणेकरून संघाला त्या क्रमांकावर चांगल्या अष्टपैलू खेळाडूचा उपयोग करता येईल, दीपक चहरने आत्मविश्वासाने सांगितले.

श्रीलंका संघाला दंड
श्रीलंकन संघासमोरील समस्या कमी होताना दिसत नाहीत. मालिका पराभवानंतर श्रीलंकेला आयसीसीने दणका दिला आहे. श्रीलंकेने  दुसऱ्या सामन्यात षटकांची गती कायम राखली नाही. त्यामुळे  दंड ठोठाविला आहे. श्रीलंकेवर एकूण सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे. तसेच आयसीसीच्या विश्वकप सुपर लीगसाठीचा एक गुणही कापण्यात आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या