RSAvsPAK : झमानचं द्विशतक हुकलं; दक्षिण आफ्रिकेनं पाकला रोखलं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

South Africa vs Pakistan 2nd ODI : पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. जोहन्सबर्गच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 बाद 341 धावांचा डोंगर उभारला होता. क्विंटन डिकॉक आणि मर्करम यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केल्यानंतर मर्करम माघारी फिरला. त्याने 39 धावा केल्या.

क्विंटन डिकॉक 80 धावा करुन परतला. पहिल्या वनडेत शतकी खेळी करणाऱ्या रेस व्हॅन डुसेन याने 60 धावांची खेळी केली. कर्णधार टेम्बा बवुमा याने 102 चेंडूत 92 धावांची सर्वोच्च खेळी केली. अखेरच्या षटकात डेविड मिलरने 27 चेंडूत 50 धावा करुन दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर 341 धावा लावल्या. पाकिस्तानकडून हॅरिस राउफ यांने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर शाहिन आफ्रिदी, हुसेन आणि अश्रफ यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. 

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर इमाम उल हक अवघ्या 5 धावांची भर घालून तंबूत परतला. धावफलकावर 70 धावा असताना बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. त्याने 31 धावा केल्या. मोहम्मद रिझवानला नोर्तजेनं खातेही उघडू दिले नाही. दानिश अझीझ 9 धावा करुन तंबूत परतला. आघाडीच्या फलंदाजासह तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर सलामीवीर फखर झमान याने एकाकी झुंज दिली. त्याने 155 चेंडूत 193 धावांची खेळी केली.

49 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तो धावबाद झाला. पाकिस्तानी संघाला निर्धारित 50 षटकात 9 बाद 324 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्तजेनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. फेहलुकवायो 2 तर रबाडा, निगडी, तरबेज शम्सी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.


​ ​

संबंधित बातम्या