इंग्लंड वन डे संघात कोरोनाचा विस्फोट; सात सदस्यांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 July 2021

ब्रिटनमध्ये कोरोनासंदर्भात निर्बंध एकीकडे शिथिल होत आहेत. विम्बल्डनमध्ये पूर्ण क्षमतेने प्रेक्षक उपस्थित राहू लागले आहेत. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षक संख्येसाठी कोणतेही निर्बंध नसतील, पण अशातच दुसरीकडे इंग्लंडच्या एकदिवसीय संघात कोरोनाचा विस्फोट झाला.

लंडन - ब्रिटनमध्ये कोरोनासंदर्भात निर्बंध एकीकडे शिथिल होत आहेत. विम्बल्डनमध्ये पूर्ण क्षमतेने प्रेक्षक उपस्थित राहू लागले आहेत. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षक संख्येसाठी कोणतेही निर्बंध नसतील, पण अशातच दुसरीकडे इंग्लंडच्या एकदिवसीय संघात कोरोनाचा विस्फोट झाला. तीन खेळाडू आणि चार सपोर्ट स्टाफ अशा सात जणांना कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे अख्ख्या संघाला अलगीकरण करावे लागले. परिणामी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाकिस्ताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी नवा संघ तयार करावा लागला.

आयपीएलमध्ये बोटाला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बेन स्टोक काही दिवसांपासून कौंटी क्रिकेट खेळू लागला आहे. तो पाकिस्ताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात नव्हता, त्यामुळे त्याची या नव्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. 

कार्डिफ येथे पाकिस्तानविरुद्ध गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. त्यासाठी मॉर्गनच्या नेतृत्वखाली इंग्लंडचा संघ तयारी करत होता. सोमवारी त्यांच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यात सात सदस्य पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. बाधित झालेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार मॉर्नग, जॉस बटलर आणि आणखी एका खेळाडूचा समावेश असल्याचे समजते.

लंडनमध्ये डेल्टाचा शिरकाव
लंडनमध्ये एकीकडे निर्बंध शिथिल होत असताना डेल्टाचा शिरकाव झालेला आहे, त्यातच खेळाडूंसाठी जैवसुरक्षा वातावरण कमी असल्याने हा प्रादुर्भाव वाढत असल्याचे इंग्लंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले. जवळपास १४ महिने आमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य कठोर निर्बांधात राहिले आहेत, त्यामुळे आम्ही काही बंधने शिथिल केली होती, असेही हॅरिसन म्हणाले.

भारतीय क्रिकेट संघ सध्या तरी निर्बंधमुक्त
लंडन - इंग्लंडच्या एकदिवसीय संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे धोक्याची घंटा वाजू लागली आहे. भारतीय क्रिकेट संघ लंडनमध्येच असून त्यांच्या २० दिवसांच्या सुट्टीवर सध्या तरी कोणतेही निर्बंध आलेले नाही.

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय संघ कुटुंबासह सध्या लंडनमध्येच सुट्टीवर आहे. हे सर्व खेळाडू १४ जुलै रोजी डरहॅम येथे एकत्र येऊन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव सुरू करणार आहे.  

लंडनमधील कोरोनाच्या वाढत्या स्थितीची आम्हाला जाणीव आहे. स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती मिळवत आहोत. सध्या तरी निर्बंधांबाबत काहीच सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे खेळाडूंची सुटी कायम आहे, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या