‘पेटीएम फर्स्ट गेम’चा सचिन तेंडुलकर ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ; सीएआयटीची टीका    

टीम ई-सकाळ
Wednesday, 16 September 2020

पेटीएमची उपकंपनी असलेल्या पेटीएम फर्स्ट गेम्स तर्फे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

मुंबई : पेटीएमची उपकंपनी असलेल्या पेटीएम फर्स्ट गेम्स तर्फे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यंदाची लांबलेली आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या बेतात असतानाच आज ‘पेटीएम फर्स्ट गेम्स’चे मुख्य संचालन अधिकारी सुधांशू गुप्ता यांनी ही घोषणा केली. ऑनलाइन फँटसी गेमच्या बाजारपेठेमधील आपला हिस्सा वाढविण्यासाठी येत्या सहा महिन्यांसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी देश-विदेशात विविध प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. 

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या रंगणार शेवटचा व निर्णायक एकदिवसीय सामना 

भारतात ‘पेटीएम फर्स्ट गेम्स’ची लोकप्रियता वाढत असताना क्रीडा रसिकांना ‘फँटसी गेम्स’चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळावा हा आमचा हेतू आहे. सचिन आमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्याने आता फँटसी गेम्स खेळण्याकरिता लागणारी बुद्धीमत्ता, डावपेच, नियोजन या बाबींचा अनुभव आम्ही मोबाईल गेम्स प्रेमींना करून देऊ. या खेळांची लोकप्रियता सचिनमुळे नक्कीच वाढेल तसेच फँटसी गेम्सची माहितीही जास्तीत जास्त लोकांना होईल. फँटसी क्रिकेटप्रमाणेच कबड्डी, फुटबॉल व बास्केटबॉल या खेळांनाही सचिनमुळे प्रोत्साहन मिळेल, असेही सुधांशू गुप्ता म्हणाले. तर क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे, आपल्याला त्यात रममाण होणे आवडते. आता या खेळात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा, डावपेच लढविण्याचा अनुभवही पेटीएम फर्स्ट गेम्स मुळे मिळेल असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. 

पेटीएमच्या फर्स्ट गेम्सला यंदाच्या आयपीएल मध्ये प्रायोजक स्पॉन्सर असलेल्या ड्रीम 11 आणि तसेच माय सर्कल 11 यांसारख्या ऑनलाइन फँटसी गेमसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. ड्रीम 11 आणि  माय सर्कल 11 यांनी यापूर्वीच महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली व रोहित शर्मा यांसारख्या क्रिकेटपटूंना आपला चेहरा म्हणून पुढे आणले होते. त्यानंतर आता पेटीएमने आपल्या फर्स्ट गेम्ससाठी सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. पेटीएम याआधीच आयपीएल 2020 स्पर्धेचा सहयोगी प्रायोजक स्पॉन्सरर आहे. 

IPL 2020 : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससोबत दुबईत कसा?

मात्र, सचिन तेंडुलकरने पेटीएमच्या फर्स्ट गेम्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून भूमिका स्वीकारल्याबद्दल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) त्याच्यावर टीका केली आहे. सीएआयटीने यासंदर्भात सचिन तेंडुलकरला पत्र लिहिले असून, या पत्रात पेटीएम फर्स्ट गेम्स ही पेटीएम आणि अलिबाबाच्या एजी टेक यांचा संयुक्त उपक्रम असल्याचे निदर्शनास आणले आहे. इतकेच नाहीतर यामध्ये चीनमधील अलीबाबा या कंपनीची भरीव गुंतवणूक असल्याचे देखील  सीएआयटी आपल्या या पत्रात नमूद केले आहे. व गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील सैन्यात झालेल्या संघर्षाचा उल्लेख करत, सचिन तेंडुलकरला या कंपनीबरोबरचा संबंध संपवण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, जून महिन्याच्या मध्यास 15 तारखेला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. व यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचीही हानी झाली होती. मात्र चीनकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून उभय देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठा फौजफाटा तैनात केला आहे आणि चीनने या काळात दोनदा सीमेवरील 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. याकारणामुळे देशभरात चीनविरोधी संतप्त भावना तयार झाल्या असून, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.          


​ ​

संबंधित बातम्या