रवी शास्त्री टी-२० विश्वकरंडकनंतर प्रशिक्षकपद सोडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 August 2021

विराट कोहलीच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून क्रिकेटविश्वात दरारा निर्माण करणाऱ्या रवी शास्त्री यांनी आपल्या या पदाचे काउंटडाउन सुरू केल्याचे वृत्त आहे. भारतीय संघांबरोबरची त्यांची प्रशिक्षकपदाची मुदत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेबरोबर संपण्याच्या मार्गावर आहे. शास्त्री फेरनिवडीसाठी उत्सुक नसल्याचे समजते.

मुंबई - विराट कोहलीच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून क्रिकेटविश्वात दरारा निर्माण करणाऱ्या रवी शास्त्री यांनी आपल्या या पदाचे काउंटडाउन सुरू केल्याचे वृत्त आहे. भारतीय संघांबरोबरची त्यांची प्रशिक्षकपदाची मुदत ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेबरोबर संपण्याच्या मार्गावर आहे. शास्त्री फेरनिवडीसाठी उत्सुक नसल्याचे समजते.

रवी शास्त्रींसह संघातील त्यांचे सहायक मार्गदर्शकही जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करत आहे. शास्त्री यांनी तर आपली भूमिका बीसीसीआयच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर मांडलेली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बीसीसीआयही आता संघाच्या मार्गदर्शनासाठी नवी टीम तयार करण्याचा विचार करत आहे.

२०१४ मध्ये शास्त्री यांनी भारतीय संघाचे संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. २०१६ च्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत ते संघासोबत कायम होते. त्यानंतर अनिल कुंबळे संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले होते. विराट कोहलीबरोबर कुंबळे यांचे पटले नाही. त्यामुळे कुंबळे दूर झाल्यानंतर २०१७ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपासून शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले, ते आत्तापर्यंत कायम आहेत.

राहुल द्रविडसाठी मार्ग मोकळा?
राहुल द्रविड यांच्याकडे भविष्यातील मुख्य मार्गदर्शक म्हणून पाहिले जात आहे. ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कार्यरत असले तरी गेल्या महिन्यातील श्रीलंका दौऱ्यात शिखर धवनच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. द्रविड यांची क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यासाठी बीसीसीआयने इच्छुकांना अर्ज करण्यास सांगितले आहे. मुख्य संघाच्या नव्या मार्गदर्शकपदासाठी ही महत्त्वाची घडामोड असल्याचे सांगितले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या