कसोटीपटू, कोचचेही अमिरातीत विलगीकरण? 

संजय घारपुरे
Wednesday, 7 October 2020

भारतीय संघ ऑस्ट्रेलियास दुबईतच रवाना होण्याची शक्‍यता 

नवी दिल्ली : चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी तसेच भारतीय क्रिकेट संघांच्या मार्गदर्शकांचे आता अमिरातीत विलगीकरण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाने अमिरातीत सध्या आयपीएलसाठी तयार केलेल्या जैवसुरक्षित वातावरणातून प्रयाण करणे योग्य होईल असा विचार होत आहे. 

भारतीय संघ दुबईतून रवाना होताना त्यात कसोटी संघासह मर्यादित षटकांच्या लढतीसाठीच निवडले जाणारे खेळाडूही असतील. त्यामुळे संघात 25 खेळाडू असण्याची शक्‍यता आहे. आता अमिरातीमधील सुरक्षित वातावरणातून संघ ऑस्ट्रेलियातील सुरक्षित वातावरणात गेल्यास कोणतेही प्रश्‍न येणार नाहीत, हाच विचार केला जात आहे. त्यामुळेच आयपीएलमध्ये खेळत नसलेले कसोटीपटू आणि संघांच्या मार्गदर्शकांना अमिरातीत विलगीकरणास सामोरे जावे लागणार आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटरचा अपघातात मृत्यू ; रुग्णालयात घेतला अखेरचा...

भारतीय संघ दुबईतून चार्टर विमानाने ऑस्ट्रेलियास रवाना होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुजारा आणि विहारी हे निव्वळ कसोटीपटू तसेच मुख्य मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यासह भारत अरुण, विक्रम राठोड, आर. श्रीधर हे दुबईत या महिन्याच्या अखेरीस दाखल होतील. तेथील विलगीकरण संपल्यानंतर ते जैवसुरक्षित वातावरणात जातील. आयपीएलमध्ये खेळत असलेले भारतीय संघातील खेळाडूही जैवसुरक्षित वातावरणातच आहेत. त्यामुळे संघाचा प्रवास सुरळीत होईल, असे भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

संघ ऑस्ट्रेलियात नेमका कुठे राहणार 
ऑस्ट्रेलियातील कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या कार्यक्रमात बदल होण्याची शक्‍यता आहे. ऑस्ट्रेलियात दाखल होणाऱ्या भारतीय संघाचे विलगीकरण ऍडलेड, पर्थ, की मेलबर्नला होणार याचाही निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर विलगीकरणाच्या कालावधीबाबत दोन्ही देशांच्या मंडळांत चर्चा सुरू आहे.


​ ​

संबंधित बातम्या