फलंदाजीची चिंता नाही : विराट कोहली

सुनंदन लेले
Thursday, 12 August 2021

अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीची चिंता करण्यासारखे नाहीच नाही, आम्ही एकत्र मिळून योग्य धावा उभारू शकतो का हा प्रश्न असतो. कोणा एकट्या खेळाडूवर जबाबदारी नसते.

अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीची चिंता करण्यासारखे नाहीच नाही, आम्ही एकत्र मिळून योग्य धावा उभारू शकतो का हा प्रश्न असतो. कोणा एकट्या खेळाडूवर जबाबदारी नसते. मला खात्री आहे की आम्ही सगळे मिळून चांगली फलंदाजी करून गरजेच्या धावा उभारू, विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्याअगोदर मतप्रदर्शन करताना म्हणाला.

शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, चार वेगवान गोलंदाजांना संघात जागा देण्यामागे एकच उद्देश असतो तो म्हणजे दोन्ही डावांत समोरच्या फलंदाजांना योग्य वेळेत आणि कमीत कमी धावसंख्येत बाद करायचे. गेल्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी ते करून दाखवले. शार्दुलनेही अपेक्षित काम केले होते. तो खेळत नसल्याने कोण त्याची जागा घेणार हे उद्याच तुम्हाला समजेल.

सामन्याबद्दल विचार कसा करतो भारतीय कप्तान असे विचारल्यावर विराट म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे एक सामना संपला की थोडा काळ खेळापासून लांब जाणे महत्त्वाचे असते. गेल्या सामन्यातून काय शिकायचे हे लक्षात ठेवायचे, पण गेल्या सामन्याचे विचार मग दूर करून नव्या जोमाने पुढच्या सामन्याच्या तयारीला लागणे मला आवडते. शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे आणि मन प्रसन्न ठेवणे गरजेचे ठरते.

पहिल्या सामन्याचा संदर्भ देताना विराटने स्पष्ट केले की, भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या एकमेव उद्देशाने इंग्लंडला आला आहे. पहिल्या सामन्यात विजय हाती घेऊन मालिकेत आघाडी घेण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलली होती जी पावसाने रोखली. दुसऱ्या सामन्यात त्याच विचारांनी आम्ही मैदानात उतरू.


​ ​

संबंधित बातम्या