न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू पाकऐवजी आयपीएलमध्ये खेळणार
आयपीएलला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या आणि शक्य होतील तेवढे अडथळे निर्माण करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेटला न्यूझीलंडच्या प्रमुख खेळडूंनी चांगलीच चपराक मारली आहे. त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन, टेंट्र बोल्ट, कायले जेमिन्सन आणि लॉकी फर्ग्युसन पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेऐवजी आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
ख्राईस्टचर्च - आयपीएलला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या आणि शक्य होतील तेवढे अडथळे निर्माण करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेटला न्यूझीलंडच्या प्रमुख खेळडूंनी चांगलीच चपराक मारली आहे. त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन, टेंट्र बोल्ट, कायले जेमिन्सन आणि लॉकी फर्ग्युसन पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेऐवजी आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
आयपीएलसाठी महत्त्वाच्या असलेल्या या घडामोडींना न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट यांनी दुजोरा दिला. आयपीएलच्या उर्वरित टप्प्यात खेळण्यास आम्ही आमच्या खेळाडूंना परवानगी दिली असल्याचे व्हाईट म्हणाले.
हा आमचा सकारात्मक पवित्रा आहे. आयपीएलला आम्ही नेहमीच सहाय्य करत आलेलो आहे. या वेळच्या आयपीएलसाठी आव्हानात्मक परिस्थिती होती, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आम्हाला महत्त्वाचे वाटत आहे, असे व्हाईट यांनी सांगितले.
पाकिस्तानने गेल्याच आठवड्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या दोन देशांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. १८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. रावळपिंडी स्टेडियममध्ये तिन्ही एकदिवसीय सामने; तर लाहोरमध्ये पाचही ट्वेन्टी-२० सामने होणार आहे.
अमिरातीत होणारी आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनासंदर्भात कठोर उपाययोजना करण्यासाठी बीसीसीआय काँटॅक्ट ट्रेसिंग सुविधा तयार करणार आहे. एखादा खेळाडू बाधित झाला, तर संपूर्ण संघावर त्याचा परिणाम होणार नाही, यासाठी ही उपाययोजना असणार आहे.
भारतात अर्धवट राहिलेल्या पहिल्या टप्प्यातील अनुभवावरून बीसीसीआय आता अधिक जागरुक असणार आहे. जैवसुरक्षा वातावरणात येण्यापूर्वी सर्व फ्रँचाईस खेळाडूंना सहा दिवसांचे विलगीकरण अनिवार्य करावे लागेल. बीसीसीआय जैवसुरक्षित १४ ठिकाणे तयार करणार आहे. यातील आठ ठिकाणे ही आठ संघांसाठी असणार आहे.
२७ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत ३१ सामने होणार आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई विरुद्ध चेन्नई अशा लढतीने सुरुवात होईल.