मी चुकलो आणि फसलो! फखर झमानने मोठ्या मनाने डिकॉकला दिली माफी

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 5 April 2021

क्रिकेट जगतात त्याच्या रन आउटवरुन क्विंटन डिकॉकच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात असताना फखर झमानने मात्र त्याला मोठ्या मनानं माफ केल्याचे पाहायला मिळते

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात धावांचा पाठलाग करताना विश्वविक्रमी खेळी करणाऱ्या फखर झमानने क्विंटन डिकॉकला माफी दिलीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात फखर झमानचे द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकले होते. तो 155 चेंडूत 193 धावांवर धावबाद झाला. त्याच्या रन आउटवरुन सोशल मीडियावर वाद पेटला आहे. क्विंटन डिकॉकने फसवून त्याला बाद केल्याचे बोलले जात आहे. बाद होण्यापूर्वी फखर झमानने धावांचा पाठलाग करताना वडेतील सर्वोच्च धावसंख्या आपल्या नावे केली होती. 

क्रिकेट जगतात त्याच्या रन आउटवरुन क्विंटन डिकॉकच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात असताना फखर झमानने मात्र त्याला मोठ्या मनानं माफ केल्याचे पाहायला मिळते. चूक माझी होती. दुसरी धाव घेत असताना हॅरिस राउफ अडचणीत असल्याचे मला वाटले. त्याच्याकडे पाहण्याच्या नादात मी क्रिजमध्ये पोहचू शकलो नाही. क्विंटन डिकॉकने काही चूक केलीये असं मला वाटत नाही, असे फखर झमान ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हणाला. 

Video : रडीचा डाव! डिकॉकनं फखर झमानला गंडवलं; काय सांगतो नियम?

MCC च्या नियमावलीनुसार मैदानातील पंच फखरच्या खात्यात दोन धावा देऊन पेनल्टीच्या रुपात पाकिस्तानच्या खात्यात 5 धावा देऊ शकले असते. पण मॅच रेफ्री किंवा मैदानातील अंपायर्संनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. कदाचित फखर आझमने कोणताही आक्षेप न घेता मैदान सोडल्यामुळे मैदानातील पंचांनी या नियमाचा वापर केला नसल्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सर्व प्रकारानंतर पाकिस्तानी फलंदाजाने वादावर पडदा टाकण्याची भूमिकाच घेतल्याचे दिसते. क्विंटन डिकॉकची कोणतीही चूक नाही, असे सांगत त्याने आपल्यातील खिलाडीवृत्तीचं दर्शन घडवून आणलंय असेच म्हणावे लागेल. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा यानेही क्विंटन डिकॉकची पाठराखण केली आहे. आपल्या गड्याने कोणताही नियम मोडला नसून त्याने चलाखीनं प्रतिस्पर्धी संघातील घातक वाटणाऱ्या फलंदाजाला बाद करण्याची भूमिका बजावल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने म्हटलंय. फखर झमानने पाकिस्तान संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. त्याची विकेट आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती. ज्यावेळी काही गोष्टी तुमच्या विरोधात होत असतात त्यावेळी सामन्याला कलाटणी देण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावे लागते, क्विंटन डिकॉकने तेच केल, असेही बवुमाने म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या