मिशेल स्टार्कची पत्नी एलिसाने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विश्वविक्रम

सूरज यादव
Monday, 28 September 2020

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आयपीएल 2020 साठी रवाना होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेला अलविदा केला. टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीने अनेक विक्रम केले आहेत.

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आयपीएल 2020 साठी रवाना होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेला अलविदा केला. धोनीला टी20 वर्ल्ड कपमध्ये पाहण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र कोरोनामुळे वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला आणि इकडे धोनीने निवृत्ती घेतली. टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीने अनेक विक्रम केले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीचे तीनही चषक जिंकले आहेत.

धोनीचा यष्टीरक्षक म्हणून टी 20 मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीचा हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या पत्नीने मोडला आहे. मिशेल स्टार्कची पत्नी एलिसा हिली हिने टी20 मध्ये यष्टीरक्षण करताना धोनीचा विक्रम मागे टाकला. धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 91 बळी घेण्याचा विक्रम आहे. 

हे वाचा - मयंकचे 45 चेंडूत विक्रमी शतक; कोहली-सेहवागला टाकलं मागे

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची यष्टीरक्षक एलिसा हिली हिने ब्रिसबेन इथं न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात दोन बळी घेत विश्वविक्रमाला गवसणी घातली. एलिसा हिलीचे टी20 मध्ये एकूण 92 बळी झाले आहेत. तिने 114 सामन्यातील 99 डावात 50 स्टम्पिंग आणि 42 झेल घेतले. तर धोनीने 98 डावातील 97 डावात 91 बळी घेतले आहेत. यात त्याने 34 स्टम्पिंग तर 57 झेले घेतले. 

हे वाचा - IPL 2020 : केएल राहुलच्या विक्रमी शतकात कोहलीचा वाटा!

एलिसा हिली हीची ओळख मिशेल स्टार्कची पत्नी अशी असली तरी ऑस्ट्रेलियाचे इयान हिली यांची पुतणी आहे. तिने आपल्या खेळाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एलिसाने टी20 मध्ये 148 धावांची वेगवान खेळी केली. या खेळीसह महिला क्रिकेटमध्ये तिने विक्रम केला होता. आतापर्यंत तिने टी20 मध्ये 2 हजार 99 धावा केल्या आहेत. यात 12 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय हिलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 शतकेसुद्धा झळकावली आहे. टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात तिने 39 चेंडूत 75 धावांची खेळी करून भारताला विजयापासून दूर ठेवलं होतं. 


​ ​

संबंधित बातम्या