AUSvsIND : पेनच्या ताफ्यात दुखापतीची वेदना; जेम्स झाला आउट

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी ऍडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवलेला होता. तर मेलबर्न येथे पार पडलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1 - 1 ने बरोबरी साधली होती. यानंतर आता तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन दुखापतीच्या कारणामुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

ऑस्ट्रलियन संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला दुखापत झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेम्स पॅटिन्सन काही दिवसांसाठी सुट्टीवर गेला होता. आणि त्यावेळेस तो घरी पडल्यामुळे दुखापतग्रस्त झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आज दिली आहे. आणि त्यामुळे तो आगामी सामन्यात मैदानात उतरणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जेम्स पॅटिन्सनला प्लेयिंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. 

याव्यतिरिक्त, मिचेल नासेर आणि सीन अबॉट हे दोन्ही खेळाडू संघासोबत आहेत. त्यामुळे जेम्स पॅटिन्सनच्या जागी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात येणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने नमूद केले असून, तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेम्स पॅटिन्सनची फिटनेस टेस्ट घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जेम्स पॅटिन्सनला संधी मिळाली नव्हती. तर तिसऱ्या सामन्यात देखील जेम्स पॅटिन्सन मैदानात उतरण्याची शक्यता निश्चित नव्हती. सध्या मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड या तीन मुख्य गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरत आहे. त्यामुळे या गोलंदाजांपैकी एकाला जरी मैदानात उतरता आले नाही तर जेम्स पॅटिन्सन त्यांच्या जागी मैदानात उतरू शकला असता.   

 


​ ​

संबंधित बातम्या