जेम्स अँडरसनची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झेप   

टीम ई-सकाळ
Wednesday, 26 August 2020

जेम्स अँडरसनने आयसीसीच्या गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत झेप घेतली आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. जेम्स अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझहर अलीला बाद करत कसोटी कारकिर्दीत 600 बळींची संख्या गाठली. व याशिवाय जेम्स अँडरसनने या सामन्यात सर्वाधिक सात गडी बाद केले. त्यामुळे जेम्स अँडरसनने आयसीसीच्या गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत झेप घेतली आहे. आयसीसीच्या गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अँडरसनने सहा स्थानांची झेप घेत आठव्या स्थानावर मजल मारली आहे. 

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण 

पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत इंग्लंडला एक डाव राखून पाकिस्तानवर विजयाची मोठी संधी होती. मात्र पावसाच्या आगमनामुळे हा सामना देखील अनिर्णित राहिला. तत्पूर्वी या कसोटीच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरु होण्यास विलंब लागला होता. परंतु त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार अझहर अली 36 धावांवर असताना जेम्स अँडरसनने त्याला जो रूटकडे झेलबाद केले. या विकेट सोबतच अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 600 बळींची संख्या गाठली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 600 गडी बाद करणारा अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच या सामन्यात त्याने सात गडी बाद केले. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले. त्यामुळे आयसीसीच्या गोलंदाजांच्या कसोटी यादीत जेम्स अँडरसन पहिल्या दहा मध्ये पोहचला असून, 781 अंकांसह आठवे स्थान पटकावले आहे. तर भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह 779 अंकांसह या यादीत 9 व्या स्थानावर विराजमान आहे. 

दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 600 बळींचा आकडा गाठलेले तिनही दिग्गज हे फिरकीपटू आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 600 गडी बाद करणारा अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. 600 पेक्षा जास्त गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्याने 133 कसोटीमध्ये 800 गडी बाद करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नचा नंबर लागतो. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 गडी बाद केले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. भारताकडून 132 सामने खेळताना अनिल कुंबळेने 619 बळी घेतले आहेत. यामध्ये एका डावात सर्व दहा गडी बाद करण्याचा विक्रमही अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कसोटी कारकिर्दीत जेम्स अँडरसनने आतापर्यंत 156 सामने खेळले आहेत. त्यानंतर अँडरसनने 600 बळींचा टप्पा गाठला असून एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी त्याने 29 वेळा केली आहे. तसेच एका सामन्यात 10 गडी बाद करण्याची किमया 3 वेळा केली आहे.    


​ ​

संबंधित बातम्या