कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची नवी गुणरचना

पीटीआय
Thursday, 1 July 2021

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या अनुभवानंतरही जाहीर करण्यात आलेल्या गुणांकनाच्या रचनेत आयसीसीने बदल केला आहे. आता संपूर्ण मालिकेऐवजी प्रत्येक सामन्यागणिक विजयाचे १२ गुण मिळतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेपासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू होणार आहे.

नवी दिल्ली - कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या अनुभवानंतरही जाहीर करण्यात आलेल्या गुणांकनाच्या रचनेत आयसीसीने बदल केला आहे. आता संपूर्ण मालिकेऐवजी प्रत्येक सामन्यागणिक विजयाचे १२ गुण मिळतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेपासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू होणार आहे.

प्रत्येक सामन्यातून विजयासाठी १२, टाय झाल्यास प्रत्येकी सहा आणि अनिर्णित राहिल्यास प्रत्येकी चार गुण मिळतील. पहिल्या स्पर्धेच्या गुण रचनेत कोणताही बदल नसेल, हीच पद्धत आता दुसऱ्या पर्वासाठीही असेल, असे आयसीसीचे हंगामी सीईओ जॉफ अराल्डिस यांनी अगोदर जाहीर केले होते; पण आयसीसीने आता या रचनेत बदल केला आहे.

पहिल्या पर्वातील गुणांच्या रचनेनुसार मालिका विजयानंतर १२० गुण मिळत होते; मग ती मालिका दोन सामन्यांची किंवा पाच सामन्यांची असली, तरी समान १२० गुण दिले जायचे; परंतु आता प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढविण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक सामन्यास विजयानंतर १२ गुण मिळतील, असे आयसीसीच्या एका कार्यकारी सदस्याने सांगितले. खेळलेले सामने आणि जिंकलेले सामने यातील टक्केवारीनुसार संघांची क्रमवारी निश्चित होईल, असेही या सदस्याने स्पष्ट केले. 

अशी आहे नवी गुणरचना
प्रत्येक सामन्यातील विजयासाठी १२ गुण
सामना टाय झाल्यास प्रत्येकी सहा गुण
अनिर्णित राहिल्यास प्रत्येकी चार गुण


​ ​

संबंधित बातम्या