द्रविडनंतर व्यंकटेश प्रसाद झाला इंदिरा नगरच्या गुंडा; पाकिस्तानी पत्रकाराला दाखवली जागा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

पाकिस्तानचा पत्रकार नजीब उल हसन यानं व्यंकटेश प्रसाद याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र

#IndiraNagarkaGunda: भारतीय संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) संयमाचे आपल्याकडे दाखले दिले जातात. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाबाहेर तो रागात कधीच दिसलेला नाही. पण राहुल द्रविडच्या रागाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यात राहुल द्रविड रागाच्या भरात बॅटने गाडीच्या काचा फोडताना पाहायला मिळते. तसेच कारमधून बाहेर येत स्वत:ला इंदिरानगरचा गुंड असल्याचे सांगताना दिसते. राहुल द्रविडचं असं रुप याधी कधीच पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा सुरु आहे. राहुल द्रविडनं यात उच्चारलेला इंदिरानगरचा गुंड हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यानंही उडी घेतली आहे. व्यंकटेश प्रसाद यानं पाकिस्तान बरोबरच्या सामन्यातील एक ऐतिहासिक फोटो ट्विट करत 'मी इंदिरा नगरचा गुंडा' आहे, असं ट्विट केलं. 

पाकिस्तानचा पत्रकार नजीब उल हसन यानं व्यंकटेश प्रसाद याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हसन याचा डाव उलटा पडला. व्यंकटेश प्रसाद यानं आपल्या खास शैलीत हसन याची बोलती बंद केली. हसन आणि प्रसाद यांच्यातील संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला. नेटकऱ्यांनीही आपापली मतं मांडली. भारतीय चाहत्यांनी हसन याला प्रचंड ट्रोल करत इतिहासाचे दाखले दिले. 

हेही वाचा ; द्रविडने बॅटने फोडल्या गाडीच्या काचा; विराटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल

व्यंकटेश प्रसाद याचं ट्विट-
व्यंकटेश प्रसाद यानं १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकातील सामन्यादरम्याचा फोटो पोस्ट केला. बंगळुरु येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्यापूर्व सामन्याचा थरार रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आमिर सोहेल यानं खणखणीत चौकार लगावत प्रसादला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण शांत प्रसादनं पुढच्याच चंडूवर सोहेलला बोल्ड करत जागा दाखवली होती. या घटनेला आता 25 वर्ष झाली असली तरी ही घटना भारतीय फॅन्स विसरलेले नाहीत. व्यंकटेश प्रसादनं याच ऐतिहासिक घटनेचा फोटो शेअर करत 'मी इंदिरा नगरचा गुंडा आहे' असं कॅप्शन दिलं. होतं. 

पाकिस्तानी पत्रकार काय म्हणाला?
प्रसादच्या ट्विटला रिप्लाय करत नजीब उल हसन यानं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. प्रसाद यानं क्रिकेट कारकिर्दीत फक्त एवढं एकच मोठे काम केलं असल्याचं हसन यानं म्हटलं. यावर प्रसाद आणि नेटकऱ्यांनी हसन याला ट्रोल केलं. 

पाकिस्तानी पत्रकाराला काय उत्तर दिलं?
पाकिस्तानी पत्रकार हसन याला प्रसाद यानं आणखी एका सामन्याची आठवण करुन दिली. प्रसाद म्हणाला की, मुजीब भाई माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मी दुसरेही यश मिळवलं आहे. १९९९ मध्ये इंग्लड येथे झालेल्या विश्वचषकात २७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले होते. त्यामुळे पाकिस्तान संघाला २२८ धावाही करता आल्या नव्हत्या. देव तुझं भलं करो...!

प्रसाद आणि पाकिस्तानी पत्रकारांच्या वादात नेटकऱ्यांनाही उडी घेतली. भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी पत्रकारांची बोलती बंद केली. काहींनी तर पुरावेच साधर करताना प्रसाद यांच्या अफलातून कामगिरीचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. 
 

 


​ ​

संबंधित बातम्या