ट्वेन्टी-२० मालिकेतही भारताची विजयी सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक त्यानंतर दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांची प्रभावशाली गोलंदाजी यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली.

कोलंबो - सूर्यकुमार यादवचे अर्धशतक त्यानंतर दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांची प्रभावशाली गोलंदाजी यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली.

दोन महिन्यानंतर याच श्रीलंका संघाला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा खेळायची आहे. त्या अगोदरच धवनच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघही त्यांना भारी पडला. 

भारताला १६४ धावांत रोखून श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, परंतु भारतीय गोलंदाजांपुढे त्यांना हे आव्हान पेलता आले नाही. १५ व्या षटकापर्यंत श्रीलंकेचा लढा कायम होता, परंतु दीपक चहरने ४४ धावा करणाऱ्या असलंकाला बाद केले आणि तेथूनच भारतीयांनी विजय निश्चित केला. 

भारताची सुरवातच निराशाजनक होती. एकदिवसीय मालिकेत स्फोटक फलंदाजी करणारा पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे शिखर धवन आणि संजू सॅमसन यांना काहीसा सावध पवित्रा घ्यावा लागला. धावांची गती मर्यादित होती. 

फॉर्मात असलेला सूर्यकुमार फलंदाजीस आला आणि गती वाढली. सूर्याने ३४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली, त्यानंतर तो लगेचच बाद झाला त्याच्या अगोदर धवन माघारी फिरला होता. अंतिम काही षटकांअगोदर हे दोन फलंदाज बाद झाल्याचा परिणाम झाला त्यातच हार्दिक पंड्याला फटके मारणे कठीण जात होते. ईशान किशनने आक्रमक २० धावा केल्यामुळे भारताला १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. 

संक्षिप्त धावफलक - भारत - २० षटकांत ५ बाद १६४ (शिखर धवन ४६ -३६ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, संजू सॅमसन २७ -२० चेंडू, २ चौकार, १ षटकार, सूर्यकुमार यादव ५० -३४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, ईशान किशन नाबाद २० -१४ चेंडू, १ चौकार, १ षटकार, चमीरा २४-२, हासरंगा २८-२) वि. वि. श्रीलंका - १८.३ षटकांत १२६(अविष्का फर्नांडो २६ -२३ चेंडू, ३ चौकार, चरिथ असलंका ४४ -२६ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, भुवनेश्वर २२-४, दीपक चहर २४-२)


​ ​

संबंधित बातम्या