इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 May 2021

इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणारा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतरच्या इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठी भारताचा ताकदवर संघ जाहीर करण्यात आला.

मुंबई - इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणारा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतरच्या इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठी भारताचा ताकदवर संघ जाहीर करण्यात आला. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रवींद्र जडेजा, विहारी आणि महम्मद शमी यांनी पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे जडेजा, विहारी आणि शमी इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत खेळू शकले नव्हते, परंतु अर्धवट स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलमध्ये खेळून जडेजा आणि शमी यांनी तंदुरुस्ती जाहीर केली. आयपीएलमध्ये  स्थान न मिळालेला विहारी लंडनमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. या तिघांचीही भारतीय संघात निवड अपेक्षित होती. 

जडेजाच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाल्यानंतर कमालीची प्रभावी कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलचे स्थान कायम राखण्यात आले आहे. 

१८ + २ अशा २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अपँडिक्सची शस्रक्रिया झालेला केएल राहुल आणि कोरोनाची लागण झालेला वृद्धिमन साहा यांचीही निवड करण्यात आली आहे, परंतु ते तंदुरुस्त झाल्यावरच लंडनला जाऊ शकतील. राखीव खेळाडू म्हणून अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि आर्झन नागसवाला यांना स्थान देण्यात आले आहे. 

संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमरा, ईशांत शर्मा, महम्मद शमी, महम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव. (केएल राहुल आणि वृद्धिमन साहा ः तंदुरुस्त ठरले तर दौऱ्यावर जाणार)

इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम -

  • १८ ते २२ जून - कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (साऊद्म्टन)
  • ४ ते ८ ऑगस्ट - पहिला कसोटी सामना वि. इंग्लंड (नॉटिंगहॅम)
  • १२ ते १६ ऑगस्ट - दुसरा कसोटी सामना (लॉडर्स)
  • २५ ते २९ ऑगस्ट - तिसरा कसोटी सामना (लीडस्)
  • २ ते ६ सप्टेंबर - चौथा कसोटी सामना (ओव्हल)
  • १० ते १४ सप्टेंबर - पाचवा कसोटी सामना (मँचेस्टर)

​ ​

संबंधित बातम्या