भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ उद्या कुटुंबासह इंग्लंड दौऱ्यासाठी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ उद्या कुटुंबासह इंग्लंड दौऱ्यासाठी प्रयाण करणार आहे. इंग्लंडकडून तशी परवानगी मिळाली आहे; मात्र कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी विलगीकरणाच्या नियमामुळे बीसीसीआयचा एकही पदाधिकारी लंडनला जाणार नाही. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मुंबई - भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ उद्या कुटुंबासह इंग्लंड दौऱ्यासाठी प्रयाण करणार आहे. इंग्लंडकडून तशी परवानगी मिळाली आहे; मात्र कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी विलगीकरणाच्या नियमामुळे बीसीसीआयचा एकही पदाधिकारी लंडनला जाणार नाही. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली.

विराट कोहलीचा इंग्लंड दौरा चार महिन्यांचा आहे. या कालावधीत खेळाडूंना जैवसुरक्षा चौकटीत राहावे लागणार आहे, त्यामुळे कुटुंब त्यांच्यासोबत असेल तर त्यांचे वास्तव्य सुखकर होईल, अशी विनंती बीसीसीआयने इंग्लंड मंडळाकडे केली होती. ही मागणी मान्य झाली, त्यामुळे विराट आणि कंपनी उद्या कुटुंबासह लंडनला रवाना होईल. हाच निकष विराटच्या संघासह इंग्लंडला जाणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनाही लावण्यात आला.

जैवसुरक्षा कवचामध्ये सातत्याने राहिल्याचा परिणाम मानसिकतेवर होत असतो. बाहेर कोठेही जाण्यास मज्जाव असतो, अशा वेळी कुटुंब सोबत असेल तर खेळाडूंना घरच्यासारखे वातावरण मिळू शकते, त्यामुळे याचा फायदा निश्चितच खेळाडूंना होईल, खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ यांनाही कुटुंब नेण्यास परवानगी मिळाली आहे, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १८ ते २२ जून (२३ ः राखीव दिवस) दरम्यान होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा लंडनला जाणार होते, परंतु १० दिवसांच्या विलगीकरणाची अट आणि हे दोघेही सध्या दुबईत आयपीएलच्या तयारीची आखणी करत असल्यामुळे त्यांना लंडनला जाता येणार नाही, त्यामुळे या प्रतिष्ठेच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचा कोणताच पदाधिकारी उपस्थित नसेल.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणारा महिलांचा संघ १६ ते १९ जूनदरम्यान इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशी मालिका आहे.


​ ​

संबंधित बातम्या