संघाने दाखवलेला विश्वास स्नेह राणाकडून सार्थ; कर्णधार मितालीचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 June 2021

पाच वर्षांनंतर भारतीय संघात परतलेल्या स्नेह राणाची कसोटीसाठी निवड करण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला. तिने पहिल्या दिवशी गोलंदाजीत तसेच शेवटच्या दिवशी झुंजार नाबाद पाऊणशतकी खेळी करीत विश्वास सार्थ ठरवला.

ब्रिस्टॉल - पाच वर्षांनंतर भारतीय संघात परतलेल्या स्नेह राणाची कसोटीसाठी निवड करण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला. तिने पहिल्या दिवशी गोलंदाजीत तसेच शेवटच्या दिवशी झुंजार नाबाद पाऊणशतकी खेळी करीत विश्वास सार्थ ठरवला.

स्नेह दुसऱ्या पसंतीची ऑफस्पिनर होती. तिने देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तिला पसंती देण्यात आली, असे भारतीय कर्णधार मिताली राजने सांगितले. ती म्हणाली, संघाचा सराव नव्हता. तसेच सामनेही फारसे नव्हते. त्यामुळे वैविध्यापेक्षा चांगली कामगिरी करीत असलेल्या खेळाडूंची निवड केली. दीप्तीप्रमाणेच स्नेह चांगली गोलंदाजी करीत होती. त्याचबरोबर ती उपयुक्त फलंदाज असल्याने तिला पसंती दिली. इंग्लंड फलंदाजांना संघात डावखुरी फिरकी गोलंदाज असल्याने तिला खेळण्याचा चांगला अनुभव होता. या परिस्थितीत देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने यशस्वी ठरलेल्या स्नेहला पसंती दिली.

भारताचा दुसरा डाव ७ बाद १९९ असा घसरला होता. स्नेहने पाऊणशतकी खेळी करताना शिखा पांडे, तानिया भाटियाच्या साथीत ४७.३ षटकात १४५ धावा जोडल्या. स्नेह पाच वर्षांनंतर खेळत होती. देशांतर्गत स्पर्धेत तिने चमक दाखवली होती. तिने आत्मविश्वासपूर्वक गोलंदाजीचा सामना केला. परिस्थितीचे भान ओळखून खेळी केली. पदार्पण करणाऱ्या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, असे मिताली म्हणाली.

दडपण असूनही नर्व्हस झालो नाही. आम्ही खेळातील मूलभूत गोष्टी लक्षात घेऊन सामना केला. त्यामुळे नव्या चेंडूनेही फार सतावले नाही. इंग्लंडच्या खेळाडू शेरेबाजी करीत होत्या; पण त्याकडेही दुर्लक्ष केले. ही खेळी करत असताना माझे शतकाकडे लक्ष कधीच नव्हते. 
- स्नेह राणा

दीर्घ लढतींसाठी स्वतःला कितीही तयार केले, तरी दीर्घ कालावधीनंतर हा सामना खेळणे सोपे नसते. सातत्याने मर्यादित षटकांच्या लढती खेळल्याने फटका कसा खेळायचा, याचाच विचार जास्त होणे स्वाभाविक आहे. सहा-सात वर्षांनी या प्रकारचा सामना खेळल्यास हे घडू शकते. जर या लढती सातत्याने होत असतील, तर खेळाडू त्यास पटकन जुळवून घेतात.
- मिताली राज, भारतीय कर्णधार


​ ​

संबंधित बातम्या