कसोटी अजिंक्यपद सामन्यानंतर भारतीय संघ ‘बबल’मधून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 June 2021

कोरोना महामारीत क्रिकेट खेळत असताना मैदानावरील तणावापेक्षा जैवसुरक्षा वातावरणात रहाणे खेळाडूंना मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक दौऱ्यात हीच कसरत करावी लागत आहे. इंग्लंड दौऱ्यातही हीच बंधने होती; परंतु कसोटी अजिंक्यपदाचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ या ‘पिंजऱ्या’तून मुक्त होणार आहे.

लंडन - कोरोना महामारीत क्रिकेट खेळत असताना मैदानावरील तणावापेक्षा जैवसुरक्षा वातावरणात रहाणे खेळाडूंना मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक दौऱ्यात हीच कसरत करावी लागत आहे. इंग्लंड दौऱ्यातही हीच बंधने होती; परंतु कसोटी अजिंक्यपदाचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ या ‘पिंजऱ्या’तून मुक्त होणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला आहे. सध्या त्याचे विलगीकरण सुरू आहे. त्यानंतर १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध कसोटी अजिंक्यपदाचा सामना होणार आहे. या सामन्यानंतर ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. 

यामध्ये जवळजवळ दीड महिना विश्रांती असणार आहे. भारतीय संघ एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे त्यांना जैवसुरक्षा वातावरणात रहावे लागले असते. इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी याबाबत वक्तव्य केले होते; परंतु लंडनमधील कोरोनाची स्थिती सुधारलेली असून आणि भारतीय संघ आत्ता कठोर जैव सुरक्षा वातावरणातून बाहेर येणार असल्याने त्यांना नंतर जैवसुरक्षा वातावरणात राहण्याची गरज नाही. परिणामी खेळाडू लंडनमध्येच सुट्टीवर जाऊ शकतील, मित्रांना भेटू शकतील, अशी माहिती बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. 

सातत्याने जैवसुरक्षा वातावरणात राहून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे सोपे नाही, याचा खेळाडूंच्या मानसिककेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती रवी शास्त्री यांनी भारतातून रवाना होताना व्यक्त केली होती. इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ थेट लंडनहून अमिरातीत आयपीएल खेळणार आहे आणि त्यानंतर टी२० विश्वकरंडक, असा कार्यक्रम आहे.


​ ​

संबंधित बातम्या