शिखर धवनने कर्णधाराची जबाबदारी ओळखून संयमी फलंदाजी केली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 July 2021

धोकादायक ठरू शकणाऱ्या आव्हानासमोर सहकारी फलंदाज अतीआक्रमक सुरुवात करून बाद होत असताना शिखर धवनने कर्णधाराची जबाबदारी ओळखून संयमी फलंदाजी केली आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतास ७ गडी आणि ८० चेंडू राखून सहज विजयी केले.

कोलंबो - धोकादायक ठरू शकणाऱ्या आव्हानासमोर सहकारी फलंदाज अतीआक्रमक सुरुवात करून बाद होत असताना शिखर धवनने कर्णधाराची जबाबदारी ओळखून संयमी फलंदाजी केली आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतास ७ गडी आणि ८० चेंडू राखून सहज विजयी केले.

श्रीलंकेच्या आघाडीच्या सहापैकी पाच फलंदाजांनी २५ पेक्षा जास्त धावा केल्यावर अर्धशतक करता आले नाही. डावातील सर्वाधिक धावा आठव्या क्रमांकावरील चमिका करुणारत्ने याने केल्या. करुणारत्नेच्या या आक्रमकतेमुळे श्रीलंकेने २६२ धावांचे आव्हान दिले. पृथ्वी शॉ आणि इशान किशनच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारताने १७.५ षटकांतच १४३ धावा केल्या होत्या, पण पृथ्वी तसेच इशानने न दाखवलेला संयम धवनने दाखवला आणि तीन अर्धशतकी भागीदारी करीत भारतास विजयी केले.

पृथ्वी शॉने तडाखेबाज सुरुवात केल्यामुळे भारताचे अर्धशतक ४.५ षटकांत झाले. उंचावरून फटका काहीसा लवकर खेळल्याने तो परतला. इशान किशन शॉच्या तुलनेत कमी आक्रमक होता. त्याच्या खेळीत तुलनेत जास्त संयम होता. तो चपळ झेलामुळे परतला. धवनने या वेळी क्वचितच चूक केली. त्याने शॉसह ५८, इशानसह ८५ आणि मनीष पांडेसह ७२ धावा जोडत भारतास विजयी पथावर नेले. धवन आणि सूर्यकुमार यादवने ४८ धावांची नाबाद भागीदारी करीत भारताचा विजय निश्चित केला.

खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना काहीशी साथ देत होती, पण त्याचा फायदा भारतीय घेऊ शकले नाहीत. सहा गोलंदाजांचा वापर झाला, पण दोघांनीच १० षटके पूर्ण केली. दीपक चहर, युजवेंद्र चहल तसेच कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, पण या तिघांपेक्षा सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी कृणाल पंड्याची झाली. भुवनेश्वर तसेच हार्दिक पंड्या अपयशी ठरत असताना कृणालने १० षटके मारा करीत केवळ २६ धावाच दिल्या.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका - ९ बाद २६२ (अविष्का फर्नांडो ३२- ३५ चेंडूत २ चौकार व १ षटकार, मिनोद भानुका २७- ४४ चेंडूत ३ चौकार, भानुका राजापक्षा २४- २२ चेंडूत २ चौकार व २ षटकार, चरिथ असलंका ३८- ६५ चेंडूत १ चौकार, दासून शनाका ३९- ५० चेंडूत २ चौकार व १ षटकार, चमिका करुणारत्ना नाबाद ४३- ३५ चेंडूत १ चौकार व २ षटकार, दुश्मांता चमिरा नाबाद १३- ६ चेंडूत १ चौकार व १ षटकार, अवांतर १६- १२ वाईड आणि १ नो बॉलसह, भुवनेश्वर कुमार ९-०-६३-०, दीपक चहर ७-१-३७-२, हार्दिक पंड्या ५-०-३३-१. युजवेंद्र चहल १०-०-५२-२, कुलदीप यादव ९-१-४८-२, कृणाल पंड्या१०-१-२६-१) 

पराजित वि. भारत - ३६.४ षटकात ३ बाद २६३ (पृथ्वी शॉ ४३- २४ चेंडूत ९ चौकार, शिखर धवन नाबाद ८६ - ९५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार, इशान किशन ५९- ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार, मनीष पांडे २६- ४० चेंडूत १ चौकार व १ षटकार, सूर्यकुमार यादव नाबाद ३१ - २० चेंडूत ५ चौकार)

शिखर धवन
८६ - धावा
९५ - चेंडू
६ - चौकार
१ - षटकार
९०.५२ - धावगती


​ ​

संबंधित बातम्या