भारताचे कसोटीत अव्वल स्थान कायम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 May 2021

कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यास सज्ज होत असलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघाने कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांक कायम राखला आहे. आयसीसीच्या वार्षिक अपडेटनुसार भारताच्या या स्थानावर शिक्कामोर्तब झाले.

मुंबई - कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यास सज्ज होत असलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघाने कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांक कायम राखला आहे. आयसीसीच्या वार्षिक अपडेटनुसार भारताच्या या स्थानावर शिक्कामोर्तब झाले. 

पुढील महिन्यात लंडनमध्ये होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या सामन्यात भारताचे प्रतिस्पर्धी असलेले न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताने इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत शानदार यश मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने २४ सामन्यांतून २९१४ गुणांसह सर्वाधिक १२१ रेटिंग मिळवले आहे.

केन विल्यम्सनचा न्यूझीलंड संघही भारतापेक्षा फार दूर नाही. १८ कसोटीतून २१६६ गुणांसह त्यांचे १२० रेटिंग आहे. अव्वल स्थानाच्या या प्रवासादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियातील मालिका २-१ तर इंग्लंडविरुद्धची मायदेशातील मालिका ३-१ अशी जिंकली होती; तर न्यूझीलंडने वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानला २-० असे हरवले होते.

तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे ही  वार्षिक क्रमवारी निश्चित होत असते. २०२०-२१ या मोसमाचा समावेश करताना २०१७-१८ मधील कामगिरी वगळण्यात आली आहे. मे २०२० पासून मिळवलेल्या यशाचे मोल १०० टक्के इतकी असते. असे आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

इंग्लंडने एका गुणाने प्रगती करत १०९ रेटिंगसह तिसरे स्थान मिळवले आहे, तर ऑस्ट्रेलियाची (१०९ रेटिंग) चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तानने भले तीन गुण मिळवले असले तरी ते पाचव्या स्थानावर कायम आहेत, तर वेस्ट इंडीजने सहावे स्थान मिळवले आहे.

कसोटी क्रमवारी
१) भारत    (१२१ रेटिंग)
२) न्यूझीलंड    (१२०)
३) इंग्लंड    (१०९)
४) ऑस्ट्रेलिया    (१०८)
५) पाकिस्तान    (९४)
६ ) वेस्ट इंडीज    (८४)
७) द. आफ्रिका    (८०)
८) श्रीलंका    (७८)
९) बांगलादेश    (४६)
१०) झिम्बाब्वे    (३५)


​ ​

संबंधित बातम्या