भारतीयांचा प्रतिहल्ला पण किवींच्या तळाच्या फलंदाजांनी सतावले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 June 2021

दोन पूर्ण दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात आघाडी घेऊन मात्र भारतावर थोडेसे वर्चस्व मिळवले आहे.

साऊदम्टन - दोन पूर्ण दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात आघाडी घेऊन मात्र भारतावर थोडेसे वर्चस्व मिळवले आहे. ४९ धावा करणारा केन विल्यम्सन आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे न्यूझीलंडला ३२ धावांची आघाडी मिळाली.

आजच्या पाचव्या दिवशी दोन सत्रांत वेगवेगळे चित्र होते. पहिल्या सत्रात भारताने न्यूझीलंडला २३ षटकांत ३४ धावाच दिल्या मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या सत्रात २७ षटकांत ११४ धावा केल्या. न्यझीलंडने या दुसऱ्या सत्रात पवित्रा बदलला जेमिन्सन (२१) आणि नवव्या क्रमांकावर खेळणाऱ्या टीम साऊदीनेही ३० धावा केल्या. भारताकडून शमीने चार तर ईशांतने तीन विकेट मिळवल्या.

काल पूर्ण दिवस वाया गेल्यानंतर आज खेळ सुरू झाला तो ढगाळ वातावरणात, बुमरा आणि ईशांत शर्मा यांनी चेंडूच्या टप्यात सुधारणा केली, परंतु फारसा प्रभाव त्यांना पाडता येत नव्हता. केन विल्यम्सन आणि रॉस टेलर संयमाने खेळत होते. धावा फार होत नव्हत्या, पण ही जोडीही फुटत नव्हती. महम्मद शमी गोलंदाजीस आला आणि फरक पडत गेला त्याचा पहिलाच चेंडू कमालीचा स्वींग झाला. याचे दडपण विल्यम्सन आणि टेलरवर आले. अखेर शमीनेच टेलरला बाद केले आणि दिवसातले पहिले यश भारताला मिळवून दिले. शुभमन गिलने त्याचा अप्रतिम झेल पकडला.

ईशांत शर्माने सकाळपासून केलेल्या मेहनतीला यश आले त्याने हेन्री निकल्सला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. एव्हाना शमी जोमात आला होता.त्याची गोलंदाजी खेळणे कठीण होत होते. त्याचा भेदक चेंडू बी जे वॉल्टिंगची यष्टी भेदून गेला. बघता बघता न्यूझीलंडने तीन फलंदाज पाठोपाठ गमावले. उपाहापर्यंतच्या २३ षटकांत न्यूझीलंडला ३४ धावांच करता आल्या आणि तीन विकेट गमावल्यामुळे या सत्रात भारताचे वर्चस्व राहिले.

दुसऱ्या सत्रात आक्रमण
उपाहारानंतर न्यूझीलंडने दृष्टिकोन बदलला. आक्रमक धावा करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. एक बाजू विल्यम्सन लढवत होता तर दुसऱ्या बाजूने कॉलिन डि ग्रॅंडहोम धावां वाढवण्याची जबाबदारी घेतली पण शमीचा एक चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या उंचपुऱ्या जेमिन्सनने वन डे स्टाईल आक्रमण सुरू केले. १६ चेंडूत २१ धावा केल्या. पण शमीला हुक मारण्याच्या प्रयत्नांत तो बाद झाला.


​ ​

संबंधित बातम्या