कसोटीचे भवितव्य आता पुढच्या दोन दिवसांवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 June 2021

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात चौथा दिवस अपेक्षेप्रमाणे पावसामुळे पूर्ण वाया गेला. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांतील खेळावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दोन दिवसांत पाऊस नसेल, उद्या ढगाळ वातावरण तर, बुधवारी सूर्यप्रकाश असेल.

साऊदम्टन - कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात चौथा दिवस अपेक्षेप्रमाणे पावसामुळे पूर्ण वाया गेला. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांतील खेळावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दोन दिवसांत पाऊस नसेल, उद्या ढगाळ वातावरण तर, बुधवारी सूर्यप्रकाश असेल.

हा अंतिम सामना निकाली ठरवण्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची सोय केली होती. या दिवसाचा उपयोग होणार हे निश्चित आहे. सामन्याचा पहिला दिवस अगोदरच पूर्णपणे वाया गेलेला आहे.

आयसीसीच्या या महत्त्वाकांक्षी सामन्यात आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झालेला आहे आणि दोन्ही संघांचे पहिले डाव पूर्ण झालेले नाहीत. मंगळवार आणि बुधवारी पूर्ण दिवस खेळ होण्याची शक्यता असली, तरी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे, परंतु भारतीय संघाला मात्र सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

भारताच्या पहिल्या डावातील २१७ धावांना प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने २ बाद १०१ अशी मजल मारली आहे. उद्याच्या दिवसात त्यांनी २०० धावांची आघाडी घेतली आणि अखेरच्या दिवशी भारताला फलंदाजी दिली तर किमान ९० षटकांच्या खेळात भारतीय फलंदाजीवर दडपण येऊ शकते. त्यासाठी भारतीय गोलंदाजांना अधिक अचुकता आणावी लागणार आहे.

फलंदाजी असेल अवघड?
आजच्या दिवसात पडलेल्या तुफान पावसामुळे मैदान ओले झाले आहे. मंगळवारी खेळ सुरू झाला तरी चेंडू सहजतेने सीमापार जाणार नाही. त्यासाठी फलंदाजांना धावांसाठी कष्ट करावे लागतील. या परिस्थितीचा भारतीय गोलंदाज कसा फायदा उठवतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या