भारताने वर्चस्वाची संधी गमावली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 June 2021

कागदावर सखोल भासणारी भारतीय फलंदाजी न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी क्रिकेट विजेतेपदाच्या लढतीत पार कोलमडली. ३ बाद १४९ अशी सुरुवात केलेल्या भारतीय संघाने सव्वादोनशे धावाही केल्या नाहीत.

साऊदम्प्टन - कागदावर सखोल भासणारी भारतीय फलंदाजी न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी क्रिकेट विजेतेपदाच्या लढतीत पार कोलमडली. ३ बाद १४९ अशी सुरुवात केलेल्या भारतीय संघाने सव्वादोनशे धावाही केल्या नाहीत. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत बिनबाद ३६ अशी भक्कम सुरुवात केली आहे.

किवी गोलंदाजांनी कमालीचा शिस्तबद्ध मारा करीत भारतीय फलंदाजांना चकवले. त्यांनी भारताचे शेपूट २५ मिनिटांत गुंडाळले. ढगाळ वातावरण स्विंग गोलंदाजीस अनुकूल असते. या वातावरणात स्विंगवर चांगले नियंत्रण राखणाऱ्या न्यूझीलंडने भारतास एकही बाय दिली नाही किंवा भारताच्या डावात एकही नो बॉल किंवा वाईड चेंडूच्या धावांचा बोनस नाही. त्यांनी भारताचा डाव ९२.१ षटकांत संपवला, पण त्यातील ३३ षटके निर्धाव आहेत. त्यांनी वेगाने धावा करणाऱ्या भारतीयांना जखडून ठेवत त्यांच्यावरील दडपण वाढवले. 

पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची ६२ धावांची भागीदारी आणि चौथ्या विकेटसाठी विराट कोहली-अजिंक्य रहाणेने जोडलेल्या ६१ धावा सोडल्यास भारतीय फलंदाजांना क्वचितच वर्चस्व राखता आले. इंग्लंडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या उपांत्य लढतीच्या दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजी जास्त भेदक झाली होती. तेच चित्र दिसले. 

भारताचा निम्मा संघ बाद केलेल्या जेमिसनने कोहलीस चकवले. तो परतताना एक रिव्ह्यूही घेऊन गेला. रहाणेचा पूल करण्याचा प्रयत्न फसला. अश्विन जडेजा फार संघर्ष करू शकले नाहीत. आव्हानात्मक परिस्थितीत किवी जास्त संयम बाळगत होते, त्यामुळेच त्यांनी वर्चस्व घेतले आहे. 

लक्षवेधक

  • कसोटी पदार्पणानंतर तेराव्या डावात कोहलीने शतक केले होते. आत्ताही सलग तेरा डावांत त्याचे शतक नाही.
  • पुजाराच्या हेल्मेटवर २०१८ पासून सात वेळा चेंडू लागला आहे. या क्रमवारीत अजिंक्य रहाणे (५) संयुक्त दुसरा
  • पहिल्या आठ कसोटीत जेमिसनच्या ४४ विकेट. न्यूझीलंड गोलंदाजात सर्वाधिक. जॅक क्रो (४१), शेन बाँड (३८) यांच्यापेक्षा सरस.

संक्षिप्त धावफलक -
भारत, पहिला डाव -
९२.१ षटकांत २१७ (रोहित शर्मा ३४, शुभमन गिल २८, चेतेश्वर पुजारा ८, विराट कोहली ४४ - १३२ चेंडूत १ चौकार, अजिंक्य रहाणे ४९ - ११७ चेंडूत ५ चौकार, रिषभ पंत ४, रविंद्र जडेजा १५, रविचंद्रन अश्विन २२ - २७ चेंडूत ३ चौकार, इशांत शर्मा ४, जसप्रीत बुमरा ०, मोहम्मद शमी नाबाद ४ - १ चेंडूत १ चौकार, टीम साऊदी २२-६-६४-१, ट्रेंट बोल्ट २१.१-४-४७-२, काईल जेमिसन २२-१२-३१-५, कॉलिन डे ग्रँडहोम १२-६-३२-०, नील वॅगनर १५-५-४०-२)


​ ​

संबंधित बातम्या