‘फायनल’चा आनंद घ्यायचाय : कोहली 

सुनंदन लेले
Thursday, 3 June 2021

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना अचानक आलेला नाही. भारतीय संघाने दोन वर्ष सातत्याने चांगले क्रिकेट खेळले म्हणून ही संधी आम्ही कमावली आहे. आम्ही कसोटी क्रिकेट मनापासून खेळतो. हा क्रिकेटचा सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्याचे जाणतो, म्हणून या सामन्यात सहभागी होण्याची मजा आहे.

चांगले क्रिकेट खेळून कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्याची संधी कमावली !
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना अचानक आलेला नाही. भारतीय संघाने दोन वर्ष सातत्याने चांगले क्रिकेट खेळले म्हणून ही संधी आम्ही कमावली आहे. आम्ही कसोटी क्रिकेट मनापासून खेळतो. हा क्रिकेटचा सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्याचे जाणतो, म्हणून या सामन्यात सहभागी होण्याची मजा आहे. आम्हाला दडपण तर सोडाच तर या फायनलचा आनंद घ्यायचा आहे, असे विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड दौऱ्‍यावर जाण्याअगोदर पत्रकारांना सांगितले.

प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ दोन कसोटी सामने खेळून मग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे आणि भारतीय संघ फक्त सराव करून मैदानात उतरणार आहे. आमच्या सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. सराव आणि तयारी या गोष्टी मनात जास्त असतात. आम्ही मनातून तयार आहोत, कणखर आहोत, असे विराट कोहलीने सांगितले.

कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना झाल्यावर इंगलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यास सहा आठवड्यांचा कालावधी आहे. तो आम्हाला फायद्याचा ठरू शकतो. कारण खेळाडूंना विश्रांती मिळेल आणि ताजेतवाने होऊन पाच सामन्यांच्या मालिकेला भिडता येईल, असे विराटने मत मांडले.

भारतीय संघ पुढील काळात खूपच जास्त क्रिकेट खेळणार असल्याबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाला, खेळाडूंना शारीरिकपेक्षा मनाने ताजे राहण्याचे मोठे आव्हान आहे. सद्य परिस्थितीत कोणालाच हे दडपण सतत झेलणे जमणार नाही. भारतीय संघ इंग्लंडला कसोटी मालिका खेळत असताना दुसरा भारतीय संघ श्रीलंकेला जाणार आहे. दुसरे म्हणजे क्रिकेटचा प्रसार करून भविष्यात ऑलिंपिक खेळात क्रिकेटचा सहभाग होण्याकरताही अशा प्रकाराची गरज लागेल.

गत न्यूझीलंड दौऱ्यात आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही म्हणूनच पराभवाला सामोरे जावे लागले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात संपूर्ण वेळ चांगले क्रिकेट एकत्रित खेळण्याचे ध्येय आम्हाला खुणावत आहे. इंग्लंडचे भरपूर दौरे केले असल्याने मला ना दडपण आहे ना चिंता. मला संघाला चांगला खेळ करायला प्रोत्साहित करायचे आहे आणि संघाला सुस्थितीत नेणारी कामगिरी करायची आहे बाकी काही नाही, असे कोहलीने विश्वासाने सांगितले.

तीन लढतींचा सामना हवा
कसोटी अजिंक्यपदाचा निकाल लावायचा असेल तर एका लढतीऐवजी बेस्ट ऑफ तीन असे सामने असावेत, त्यामुळे समान संधी मिळेल, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

मानसिक थकवा...लगेचच सांगा!
कोणालाच मैदान ते हॉटेल आणि हॉटेल ते मैदान असे जगून सर्वोत्तम खेळ सातत्याने करणे शक्य होणार नाही. खेळाडूंना आम्ही विश्वासात घेऊन सांगत आहोत की कोणाला मानसिक थकवा जाणवू लागला तर लगेच सांगा आणि छोटी विश्रांती घेऊन परत या’, कोहलीनेही शास्त्रीच्या मुद्द्याला दुजोरा दिला.


​ ​

संबंधित बातम्या