अश्विन सार्वकालीक सर्वोत्तम कसा? संजय मांजरेकर यांची विचारणा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 June 2021

रविचंद्रन अश्विनची सार्वकालीक सर्वोत्तम गोलंदाजात गणना कशी होते, हेच मला कळत नाही. क्रिकेट जगतातील आघाडीच्या देशात तो प्रभावी नाही, अशी टिप्पणी संजय मांजरेकर यांनी केली.

मुंबई - रविचंद्रन अश्विनची सार्वकालीक सर्वोत्तम गोलंदाजात गणना कशी होते, हेच मला कळत नाही. क्रिकेट जगतातील आघाडीच्या देशात तो प्रभावी नाही, अशी टिप्पणी संजय मांजरेकर यांनी केली. 

मांजरेकर यांनी काही वर्षांपूर्वी रवींद्र जडेजास लक्ष्य केले होते. आता त्यांनी अश्विनला सार्वकालीक सर्वोत्तम म्हणणे पसंत नाही. अश्विनने ७८ कसोटींत ४०९ फलंदाज बाद केले आहेत. त्यापैकी २८६ भारतातील आहेत. त्याने ३० पैकी २६ वेळा निम्मा संघ भारतात बाद केला आहे. 

अश्विनची गणना काही जण सार्वकालीक सर्वोत्तम गोलंदाजात करतात. ते मला मान्य नाही. अश्विन दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशात प्रभावी नाही. तिथे त्या देशात त्याने एकाही डावात निम्मा संघ बाद केलेला नाही, असे मांजरेकर यांनी सांगितले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने चार वर्षात अश्विनच्या तोडीस तोड कामगिरी केली आहे, एवढेच नव्हे तर अक्षर पटेल जास्त भरवशाचा गोलंदाज होत आहे, याकडे मांजरेकर यांनी लक्ष वेधले. 

अश्विन एकहाती संघ बाद करतो, असे म्हंटले जाते. भारतीय खेळपट्ट्या त्याच्या गोलंदाजीस पोषक आहेत. पण याच तोडीची कामगिरी जडेजाची आहे. इंग्लंडविरुद्ध अश्विनपेक्षा अक्षर पटेल जास्त यशस्वी होता, असे मांजरेकर यांनी सांगितले. पटेलने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटीत २७ फलंदाज बाद केले, तर अश्विनने चार कसोटींत ३२ जणांना टिपले होते.

भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये सराव सुरू
साऊदम्प्टन - जागतिक कसोटी क्रिकेट जगज्जेतेपद लढतीसाठी भारतीय संघाचा सराव सुरू झाला आहे. तीन दिवसांचे सक्तीचे विलगीकरण संपल्याने भारतीय संघास जैवसुरक्षित वातावरणातील सरावास मंजुरी देण्यात आली आहे.  

भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी जैवसुरक्षा वातावरणात होता, त्यामुळे कठोर विलगीकरणातून भारतीय संघास सूट मिळाली आहे. इंग्लंडमधील कसोटी जगज्जेतेपद लढतीपूर्वी तीन आठवडे भारतीय संघ साऊदम्प्टनला दाखल झाला आहे. ही लढत १८ जूनपासून सुरू होणार आहे.

संघाच्या सरावाची छायाचित्रे रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी ट्विट केली आहेत. जडेजाने गोलंदाजी करीत असल्याची चार छायाचित्रे ट्विट करताना त्यासोबत साऊदम्प्टनमधील पहिला सराव असे म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या