AUSvsIND : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होऊ शकतो नवा विक्रम

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा पूर्णपणे तंदरुस्त झाला असून, तो भारतीय संघाच्या डावाची सुरवात करू शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा पूर्णपणे तंदरुस्त झाला असून, तो भारतीय संघाच्या डावाची सुरवात करू शकतो. रोहित शर्माने 2019 मध्ये टीम इंडियाकडून कसोटीच्या डावाची सुरवात करण्यास सुरवात केली होती. आणि त्यानंतर आतापर्यंत पाच सामने खेळताना त्याने तीन शतके झळकावलेली आहेत. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये हिटमॅन सेट झाला तर पुन्हा त्याच्याकडून मोठी खेळी दिसू शकते.   

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

आतापर्यंत रोहित शर्माची खेळी पाहिल्यास तो क्रिझवर काही काळ टिकल्यास ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सध्या रोहित शर्मा षटकार मारण्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. रोहितच्या नावावर 423 षटकार जमा आहे. आणि भारतीय खेळाडूंमध्ये  हिटमॅन रोहित शर्मा षटकार खेचण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. कांगारूंविरुद्ध रोहितने 99 षटकार ठोकलेले आहेत. आणि पुढील कसोटी सामन्यात रोहित शर्माने एक षटकार मारल्यास त्याच्या नावावर षटकारांचे शतक होणार आहे. आणि त्यासोबतच ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरेल.  

तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड देखील रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने केवळ सहा डावांमध्ये एकूण 20 षटकार फाटकावलेले आहेत. यानंतर भारतीय संघाचाच फलंदाज मयांक अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 18 डावात 17 सिक्स मारलेले आहे. आणि तिसऱ्या स्थानावर रवींद्र जडेजा असून, त्याने 12 डावात मिळून एकूण 10 षटकार मारलेले आहेत. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार लागवणारे फलंदाज - 

रोहित शर्मा (भारत) - 99 षटकार

इयॉन मॉर्गन (इंग्लंड) - 63 षटकार

ब्रॅंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) - 61 षटकार

सचिन तेंडुलकर (भारत) - 60 षटकार

महेंद्रसिंग धोनी (भारत) - 60 षटकार

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सिक्स खेचणारे फलंदाज - 

रोहित शर्मा (भारत) - 20 षटकार  

मयांक अग्रवाल (भारत) -  17 षटकार  

रवींद्र जडेजा (भारत) - 10 षटकार  

काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे असलेल्या नॅशनल क्रिकेट ऍकॅडमीत (एनसीए) रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली होती. व त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला होता. तर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सुरवातीला काही सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. व त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यात देखील तो अनुपस्थित राहिला होता.


​ ​

संबंधित बातम्या