ENG vs AU ODI - मॅक्सवेल-कॅरीने पळवला जगज्जेत्यांच्या तोंडचा घास; ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

इंग्लंडने दिलेल्या 303 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अर्धा संघ फक्त 73 धावात तंबूत परतला होता. 

ओल्ड ट्रॅफर्ड - ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला तीन गडी राखून पराभूत केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली ती फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरीने. या दोघांनीही धमाकेदार शतकी खेळी करत इंग्लंडने दिलेलं 303 धावांच लक्ष्य 2 चेंडू बाकी असतानाच पूर्ण केलं. इंग्लंड गेल्या चार वर्षात पहिल्यांदा मायदेशात एकदिवसीय मालिकेत पराभूत झालं आहे. 2016 पासून इंग्लडने घरच्या मैदानात एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. 

इंग्लंडने दिलेल्या 303 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अर्धा संघ फक्त 73 धावात तंबूत परतला होता. डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच यांसारखे दिग्गज फलंदाज 11 षटकापर्यंत बाद झाले होते. वॉर्नरला जो रूटने घरचा रस्ता दाखवला तर फिंचला ख्रिस वोक्सने बाद केलं. ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी 21 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर लागोपाठ खेळाडू मैदानावर फक्त हजेरी लावायचं काम करत होते. 17 व्या षटकापर्यंत 5 गडी बाद झाले होते. त्यावेळी इंग्लंडने दिलेलं 303 धावांचं आव्हान अशक्यप्राय असंच वाटत होतं. 

ऑस्ट्रेलियासमोर पराभवाचे संकट दिसत असतानाच मॅक्सवेल आणि कॅरीने डावाची सूत्रे हातात घेतली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 212 धावांची विक्रमी भागिदारी केली. मॅक्सवेलनं 90 चेंडूत 108 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले. याशिवाय कॅरीने 114 चेंडूत 106 धावा काढल्या. कॅरी 49 व्या षटकापर्यंत मैदानात होता. मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. 

तत्पूर्वी, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनं शतकी खेळी केली. बेअरस्टोची 126 चेंडूत 122 धावांची शतकी खेळी व्यर्थ गेली. त्याच्याशिवाय सॅम बिलिंग्सने 57 तर ख्रिस वोक्सने 53 धावा केल्या. इंग्लंडची सुरुवातही धडपडत झाली. स्टार्कने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर जेसन रॉयला शून्यावर बाद केलं. त्यानंतर जो रूटलासुद्धा पायचित केलं. सुरुवातीला बसलेल्या पहिल्या दोन धक्क्यानंतर इंग्लंडने 303 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते.


​ ​

संबंधित बातम्या