भारताचे गुणगान गाणाऱ्या रमीझला अध्यक्ष करू नका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

रमीझ राजा यांनी पाकिस्तान संघावर वारंवार टीका केलेली आहे आणि सध्या तर ते भारतीय गुणगान गात आहेत, त्यामुळे त्यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख करू नका, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाझ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे.

कराची - रमीझ राजा यांनी पाकिस्तान संघावर वारंवार टीका केलेली आहे आणि सध्या तर ते भारतीय गुणगान गात आहेत, त्यामुळे त्यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख करू नका, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाझ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे.

इम्रान खान, सर्फराज नवाझ आणि रमीझ खानही समकालीन खेळाडू आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुखपद सध्या रिकामे असून त्या ठिकाणी रमीझ राजा यांची वर्णी पंतप्रधान इम्रान खान लावण्याची शक्यता आहे. यावरून रमीझ यांचे विरोधक सरसावले आहेत. रमीझ यांच्याऐवजी झहीर अब्बास किंवा माजीद खान यांचा विचार करावा, असेही सर्फराज नवाझ यांनी इम्रान खान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘एहसान मनी यांच्या ठिकाणी तुम्ही रमीझ राजा यांची नियुक्ती केल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. तुम्ही पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे आश्रयदाते आहात, पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करायची हा अधिकार तुमचा आहे. पण रमीझ राजाच्या नावाचा विचार तुम्ही करू नका,’ असे पत्र सर्फराझ यांनी लंडनहून लिहिले आहे.

‘या पदावर कोणाचीही नियुक्ती करताना तुम्ही रमीझ राजा यांचे विचार कोणत्या बाजूने झुकलेले आहेत याचा विचार करावा. ते नेहमीच पाकिस्तान क्रिकेटवर टीका करत आलेले आहेत. त्याच वेळी ते भारतीय संघाचे कौतुक करत असतात,’ असा उल्लेख  सर्फराज यांनी पत्रात केला आहे. पुढे ते म्हणतात, ‘जर तुम्ही रमीझ राजा यांची नियुक्ती केली असेल तर ते खेदजनक असेल. तसेच ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचे वर्चस्व मान्य केल्यासारखे असेल.’

माजीद खान किंवा झहीर अब्बास यांचे नाव पाकिस्तान क्रिकेटमध्ये सन्मानाने घेतले जाते. माजीद यांचे आयसीसी पदाधिकाऱ्यांशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाचा विचार व्हावा असा उल्लेख सर्फराज यांनी पुन्हा केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या