आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटरचा अपघातात मृत्यू ; रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

टीम ई-सकाळ
Tuesday, 6 October 2020

शनिवारी 3 तारखेला अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात झालेल्या बॉम्ब स्फोटात अफगाणिस्तानचे पंच बिस्मिल्लाह जान शिंवरी यांचा मृत्यू झाला होता.

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा सलामीवीर नजीबुल्लाह तर्कई याचा अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. 29 वर्षीय क्रिकेटर नजीबुल्लाह तर्कईचा 2 ऑक्टोबर रोजी कार अपघात झाला होता. त्यानंतर त्याची स्थिती चिंताजनक बनली होती. मात्र आज नजीबुल्लाहचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. नजीबुल्लाह रस्ता ओलांडताना त्याला एका कारने ठोकरले होते. दुर्घटनेनंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.  

मुंबईसमोर आज राजस्थाचे आव्हान 

नजीबुल्लाहच्या अवकाळी मृत्यूनंतर क्रिकेट जगतातून व तसेच अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करत, अफगाणिस्तान क्रिकेटला त्यांच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटरच्या निधनामुळे फार दु: ख झाल्याचे म्हटले आहे. एक चांगली व्यक्ती आणि आक्रमक सलामीवीर क्रिकेटपटू गमावल्याने अफगाणिस्तानच्या क्रिकेटचे नुकसान झाल्याचे मंडळाने आपल्या निवेदनात लिहिले आहे.  

त्यानंतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद नबीने सोशल माध्यमावरील ट्विटरवर नजीबुल्लाहच्या जाण्यामुळे एक चांगला मित्र आणि उत्तम सलामीवीर गमावल्याचे म्हटले आहे. याशिवाय नजीबुल्लाहच्या अचानक जाण्यामुळे मोठा धक्का बसल्याचे मोहम्मद नबीने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. याव्यतिरिक्त आयपीएल मध्ये सन रायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत असलेल्या अफगाणिस्तानच्या राशिद खानने नजीबुल्लाहच्या निधनावर शोक व्यक्त करत त्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

दरम्यान, शनिवारी 3 तारखेला अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात झालेल्या बॉम्ब स्फोटात अफगाणिस्तानचे पंच बिस्मिल्लाह जान शिंवरी यांचा मृत्यू झाला होता. शिंवरी यांनी आयसीसी संलग्नित 36 सामन्यासह एसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी केली आहे. त्यामुळे नजीबुल्लाह तर्कई आणि पंच बिस्मिल्लाह जान शिंवरी यांच्या जाण्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे.              


​ ​

संबंधित बातम्या