कोरोनाबाधितांना संघातून थेट डच्चू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची मुंबईत आल्यावर कोरोना चाचणी होईल. त्या चाचणीत बाधित आढळणाऱ्या खेळाडूंना थेट दौऱ्यास मुकावे लागेल, असा इशारा भारतीय क्रिकेट मंडळाने दिला आहे.

नवी दिल्ली - इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची मुंबईत आल्यावर कोरोना चाचणी होईल. त्या चाचणीत बाधित आढळणाऱ्या खेळाडूंना थेट दौऱ्यास मुकावे लागेल, असा इशारा भारतीय क्रिकेट मंडळाने दिला आहे.

जागतिक कसोटी विजेतेपद लढत तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ खास विमानाने जाणार आहे. या संघातील सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफची मुंबईत चाचणी होणार आहे. दौऱ्यासाठी निवडलेल्यांना कुटुंबासमवेत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच त्यांच्या कुटुंबीयांची मुंबईत कोरोना चाचणी होईल. दोन्ही चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची गरज आहे. त्यानंतरच ते जैवसुरक्षा वातावरणात प्रवेश करतील. संघातील सर्व सदस्यांना मुंबईला कार अथवा विमानाने येण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सर्वांना १९ मेपर्यंत मुंबईत दाखल होण्याची सूचना देण्यात आली आहे. 

दरम्यान, भारतीयांना इंग्लंडमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. त्याचबरोबर परदेशी व्यक्तींसाठी किमान १४ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे. ते सात दिवसांचे करावे, यासाठी भारती मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. 

आयपीएलच्या उर्वरित लढती इंग्लंड खेळाडूंविना
लांबणीवर टाकण्यात आलेल्या आयपीएलमधील उर्वरित लढतींसाठी उपलब्ध नसतील, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. लांबणीवर टाकण्यात आलेली आयपीएल सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा विश्वकरंडक ट्वेंटी- २० स्पर्धेनंतर होण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघ सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तसेच विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धा संपल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आहे. आयपीएलमध्ये इंग्लंडच्या ११ खेळाडूंचा सहभाग आहे.


​ ​

संबंधित बातम्या