भुवी आयपीएललाच नव्हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासही मुकणार 

संजय घारपुरे
Monday, 5 October 2020

पूर्ण सराव नसताना तसेच प्रतिकूल हवामानात आयपीएल खेळण्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

दुबई : पूर्ण सराव नसताना तसेच प्रतिकूल हवामानात आयपीएल खेळण्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्याचबरोबर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासही मुकण्याची दाट शक्‍यता आहे. 

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत 19 वे षटक टाकत असताना भुवनेश्वरचा स्नायू दुखावला. त्या षटकात केवळ एक चेंडू टाकल्यावर त्याला नीट चालताही येत नव्हते. भुवनेश्वरची दुखापत दुसऱ्या अथवा तिसऱ्या श्रेणीतील आहे. त्यामुळे त्याला सहा ते आठ आठवडे किमान विश्रांती घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे त्याचा ऑस्ट्रेलिया दौराही हुकण्याची शक्‍यता आहे, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शारजात दोनशे धावांनंतरही हारजा 
 
भुवनेश्वरने या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करताना चार सामन्यानंतर सातचा इकॉनॉमी रेट राखला होता. तसेच तीन फलंदाजही बाद केले होते. त्याची अखेरच्या षटकातील भेदक गोलंदाजी ही हैदराबादसाठी जमेची बाब होती. आता त्याच्या अनुपस्थितीत हाणामारीच्या षटकातील गोलंदाजाचा प्रश्न हैदराबादला सतावणार आहे. 

भुवनेश्वर मायदेशी परत न येता अमिरातीतच राहणार आहे. तिथेच त्याच्यावर भारतीय संघाचे फिझिओ नितीन पटेल उपचार करतील. तो करारबद्ध खेळाडू असल्याने त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेचा खर्चही भारतीय मंडळच करणार आहे. गेले वर्षभर भुवनेश्वरला दुखापतीने सतावले आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी अनुपलब्ध होता. आयपीएलद्वारे त्याने पुनरागमन केले होते. गेल्या वर्षभरात तो सरासरी तीन महिन्यांनी अनफिट होत आहे. 

अमित मिश्राच्या बोटाला दुखापत 
दिल्ली कॅपिटल्सचा लेगस्पिनर अमित मिश्रा याच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधून माघार घेणे भाग पडले आहे. कोलकाताच्या नितीश राणाचा झेल घेण्याच्या प्रयत्नात अमितला दुखापत झाली होती. त्यानंतरही त्याने दोन षटके गोलंदाजी केली होती. त्यात त्याने शुभमन गिललाही बाद केले होते.

       


​ ​

संबंधित बातम्या