इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे सर्वांत आव्हानात्मक : कोहली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 August 2021

इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे मला सर्वांत आव्हानात्मक वाटते आहे. ही अशी जागा नाही, जिथे फलंदाज मनात येईल तशी फटकेबाजी करू शकतो. इथे फलंदाजी करताना आपण स्थिरावलो आहे असे वाटत नाही. कितीही मोठे फलंदाज असलात, तरी इथे मैदानात उतरल्यावर तुमचा अहंकार मागे ठेवायला लागतो.

लंडन - इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे मला सर्वांत आव्हानात्मक वाटते आहे. ही अशी जागा नाही, जिथे फलंदाज मनात येईल तशी फटकेबाजी करू शकतो. इथे फलंदाजी करताना आपण स्थिरावलो आहे असे वाटत नाही. कितीही मोठे फलंदाज असलात, तरी इथे मैदानात उतरल्यावर तुमचा अहंकार मागे ठेवायला लागतो. संयम राखावा लागतो. निर्णयाला धार असावी लागते. एक छोटी चूक तुम्हाला तंबूत परत पाठवू शकते, असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

फलंदाज २० किंवा ८० धावांवर खेळत असो; एकाग्रता ढासळली तर विकेट जाऊ शकते. म्हणून मला इंग्लंडमध्ये फलंदाजी करायचे आव्हान आवडते, असेही विराटने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

पहिल्या दोन सामन्यांवर भाष्य करताना विराटने सांगितले, की पहिल्या सामन्यानंतर आम्ही निराश झालो, कारण जिंकायची संधी आम्हाला जास्त होती. दुसऱ्या कसोटीत आम्ही त्याच एकाग्रतेने उतरलो. इंग्लंडलाही हे कळून चुकले असेल, की हा संघ मागे हटणारा नाही. आम्ही चिथावणीने मागे सरणार नाही. उलट प्रेरणा घेणारे आहोत.

‘सिराजची प्रगती आश्चर्य वाटणारी नाही. तो एक आत्मविश्वासाने भारलेला गोलंदाज आहे. कौशल्य होतेच आता त्याला दिशा आलीय. आक्रमक गोलंदाज जो सतत बाद करायचा विचार करतोय,’मोहंमद सिराजचे कौतुक करताना कर्णधार म्हणाला.

विराटचा भारतीय संघ लीड्‌स मैदानावर पहिल्यांदा कसोटी खेळणार आहे.

रोहित शर्मा- केएलराहुलचे कौतूक
रोहित शर्मा- केएल राहुलचे कौतुक करायला विराट विसरला नाही. परदेश दौऱ्यात सलामीच्या जोडीला मोल आहे. रोहितने कसोटी सामन्यात खेळताना तंत्रात केलेले बदल लक्षणीय आहेत, तसेच संधी मिळालेला राहुल मस्त खेळत आहेत. दोघे संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत. दोनही कसोटीत चांगल्या कामगिरीत त्यांचे योगदान मोठे आहे.


​ ​

संबंधित बातम्या