ऑस्ट्रेलिया महिलांचा 21 विजयांचा पराक्रम ; पुरुष संघाच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी 

संजय घारपुरे
Wednesday, 7 October 2020

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने आपल्या पुरुष संघाच्या सलग 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील विजयांशी बरोबरी साधली.

लंडन : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने आपल्या पुरुष संघाच्या सलग 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील विजयांशी बरोबरी साधली. त्यांनी या विक्रमाचा आनंद साजरा करताना मायदेशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली. 

मेग लॅनिंग, तसेच अष्टपैलू एलिस पेरी यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 232 धावांनी पराजित करताना 5 बाद 325 अशी धावसंख्या उभारली होती. दुसऱ्या सामन्यात नाबाद शतकी खेळी करताना लॅनिंगच्या पोटरीचा स्नायू दुखावला होता. तिच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन किवी बाजी मारतील, अशी चर्चा सुरू होती, पण ऑस्ट्रेलिया संघाने आपली ताकद दाखवली. 

IPL2020 - केकेआरने पाच वर्षांनी घेतला 'धाडसी' निर्णय; फायदा होणार का?

रिकी पॉंटिंग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने 2003 मध्ये सलग 21 लढती जिंकल्या होत्या, तर आता कांगारुंच्या महिला संघाने 2018 ते 2020 या कालावधीत 21 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी करताना न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 जिंकली. 

लॅनिंग नसल्यामुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियास प्रथम फलंदाजी दिली. रॅशेल हेन्स (96) आणि ऍलिसा हिली यांनी 25.5 षटकांत 144 धावांची सलामी दिली, त्यानंतर हेन्स आणि ऍनाबेल संदरलॅंडने 78 चेंडूत 87 धावा जोडल्या. तर ऍश्‍ले गार्डनर, बेथ मूरी आणि ताहिया मॅकग्रॅथ यांनी अखेरच्या 10 षटकात 104 धावांचा चोप दिला. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 27 षटकांत 93 धावांत संपवताना ऑस्ट्रेलियाच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या. 

ऑस्ट्रेलिया महिलांचा धडाका 

12 ऑक्‍टोबर 2018 ते 7 ऑक्‍टोबर 2020 
वि. भारत 3-0 
वि. पाकिस्तान 3-0 
वि. न्यूझीलंड 3-0 
वि. इंग्लंड 3-0 
वि. वेस्ट इंडीज 3-0 
वि. श्रीलंका 3-0 
वि. न्यूझीलंड 3-0 
(बेथ मूनी, ऍलीसा हिली, रॅशेल हेन्स आणि ऍश्‍ले गार्डनर या सर्व 21 सामने खेळल्या आहेत)


​ ​

संबंधित बातम्या