अमिरातीत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

ऑस्ट्रेलियाने आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा ॲरोन फिंचकडे असेल. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंना पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.

सिडनी - ऑस्ट्रेलियाने आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा ॲरोन फिंचकडे असेल. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंना पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. स्टीव्ह स्मिथ नुकताच त्याच्या कोपराच्या दुखापतीतून सावरला आहे, तर कर्णधार ॲरोन फिंचच्याही गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.

आता हे दोघेही खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे सांगितले जात आहे. डेव्हिड वॉर्नरला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. काही काळ संघाबाहेर राहिल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस आणि पॅट कमिन्सदेखील पुन्हा एकदा संघात परतले आहेत. निवड समितीने यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स केरी आणि गोलंदाज झाय रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांच्यासह नऊ खेळाडूंना वगळले. हे सर्व जण वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत खेळले होते. या वर्षी टी-२० विश्वकरंडक भारतात नियोजित होता; मात्र भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आयसीसीने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे विश्वकरंडकाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया संघ - ॲरोन फिंच (कर्णधार), अॅश्टन अगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जॉश हेझलवूड, जॉश इग्लिस (यष्टिरक्षक), मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा, डॅनियल ख्रिश्चन, नॅथन एलिस, डॅनियल सॅम.

आमच्याकडे जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत, जे सांघिक कामगिरीच्या जोरावर जगातील सर्वोत्तम टी-२० संघांविरुद्ध यश मिळवू शकतात. त्यामुळे हा संघ येत्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
- जॉर्ज बेली, निवड समितीचे अध्यक्ष


​ ​

संबंधित बातम्या