लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी 'राफेल' विषयी म्हणतो... 

टीम ई-सकाळ
Thursday, 10 September 2020

भारतीय हवाई दलात काल गुरुवारी अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला.

भारतीय हवाई दलात काल गुरुवारी अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राफेल लढाऊ विमानांच्या हवाई दलातील समावेशानंतर, जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांना जगातील सर्वोत्तम लढाऊ पायलट मिळाले असल्याचे म्हटले आहे. 

हिटमॅनने मारलेला सिक्स आदळला चालत्या बसवर ; एकदा पहाच 

अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या अड्ड्यावर काल 10 सप्टेंबरला राफेल लढाऊ विमानांचा भारतीय वायूसेनेत औपचारिक समावेश करण्यात आला. यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र सेनादलाचे मंत्री फ्लॉरेन्स पार्ली उपस्थित होते. तसेच भारताचे संरक्षणदल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावरील ट्विटरवर, भारतीय हवाई दलात राफेल विमानाच्या समावेशामुळे उत्साही असल्याचे म्हणत स्वागत केले आहे. त्याचबरोबर या विमानांमुळे भारतीय वैमानिकांच्या हातात मोठ्या अस्त्राचा समावेश झाल्याचे एम एस धोनीने म्हटले आहे. 

याशिवाय, धोनीने भारतीय वायू सेनेच्या ग्लोरियस 17 व्या स्क्वॉड्रनला राफेल विमानांच्या समावेशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि राफेल अत्याधुनिक लढाऊ  विमान मिराज 2000 च्या सर्व्हिस रेकॉर्डवर मात करेल अशी आशा व्यक्त त्याने केली आहे. एवढेच नाही तर, सुखोई 30 एमकेआय हे आपले आवडते लढाऊ विमान असल्याचे धोनीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले असून, भारतीय वैमानिकांना पुन्हा डॉगफाईट (लढाऊ विमानांचे हवेतील युद्ध) करण्यासाठी नवीन लक्ष्य सापडल्याचे एम एस धोनीने म्हटले आहे.            

दरम्यान, भारताने 2016 मध्ये 59 हजार कोटी किमतीत फ्रान्सच्या देसाल्ट एव्हिएशनच्या 5 व्या जनरेशन मधील 36 राफेल विमानांची खरेदी केली होती. त्यानंतर चार वर्षाच्या अवधीनंतर यावर्षी जुलै महिन्यातील 29 तारखेला पहिली पाच राफेल विमाने भारतीय भूमीवर दाखल झाली होती. यातील तीन विमाने ही सिंगल सीट आहेत. तर, दोन डबल सीटर आहेत. राफेल लढाऊ विमानांच्या भारतीय वायू सेनेतील समावेशामुळे हवाई दलाची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे.          


​ ​

संबंधित बातम्या