पाक क्रिकेटपटूंचे मानधनच कापा : सिकंदर बख्त 

वृत्तसंस्था
Monday, 17 June 2019

संघनिवड अजिबात बरोबर नाही. या वर्ल्ड कपसाठी थोडे तरी नियोजन झाले आहे असे मला अजिबात वाटत नाही. हार-जीत खेळाचाच भाग असतो; पण आम्ही अजिबात झुंज न देता गारद झालो. 
- वसीम अक्रम 

कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही. 

माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली कामगिरी केली नाही तर मानधन कापण्याची तशी पद्धतच पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने सुरू करावी, असे आवाहन त्यांनी व्यक्त केले. या खेळाडूंना जास्त जबाबदार बनविण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. त्यातून त्यांना दडपणाखाली तसेच मानधनानुसार कामगिरी करण्याची जाणीव होईल. 

इतरही माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली. ती अशी : 
संघनिवड अजिबात बरोबर नाही. या वर्ल्ड कपसाठी थोडे तरी नियोजन झाले आहे असे मला अजिबात वाटत नाही. हार-जीत खेळाचाच भाग असतो; पण आम्ही अजिबात झुंज न देता गारद झालो. 
- वसीम अक्रम 

नाणेफेक जिंकली तर आधी गोलंदाजी करू, असे बोलून विराट कोहली मुळात माइंड गेम खेळला. आपण त्याच्या सापळ्यात अडकलो. सर्फराजपेक्षा कितीतरी धूर्त आणि सरस कर्णधार असल्याचे विराटने दाखवून दिले. 
- बासीत अली, माजी कसोटी फलंदाज 

संघाची देहबोली अजिबात सकारात्मक नव्हती. हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा होता, आपल्याला कधीच हरायचे नव्हते; पण कर्णधार सर्फराजसह कोणत्याही खेळाडूच्या देहबोलीत कसलाच जोश दिसत नव्हता. दोन वर्षांपूर्वी चॅंपियन्स ट्रॉफीत विराटने नाणेफेक जिंकून आपल्याला फलंदाजी देण्याची चूक केली होती. हीच चूक सर्फराजने केली. 
- महंमद युसूफ, माजी कर्णधार 

भारताविरुद्ध खेळताना पाक संघात आत्मविश्वासाचा अभाव होता. भारतीय संघ कितीही बलाढ्य असला तरी पाक संघात प्रेरणा, जोश किंवा क्षमतेवर विश्वास ठेवत जिंकण्याची क्षमता असे काहीही नव्हते. पूर्वी आमच्या काळात जेव्हा इतक्‍या सुविधा नव्हत्या, तेव्हा आम्ही प्रेरणादायी वृत्तीच्या जोरावर भारताविरुद्ध इतके सामने जिंकत होतो. आता आपल्या तुलनेत भारतीय खेळाडूंकडे हे गुण मला जास्त दिसतात. 
- मोहसीन खान, माजी सलामीवीर 

खेळाडूंना प्लॅन देण्याची जबाबदारी कर्णधार आणि प्रशिक्षकांची होती. खेळाडू सामन्यातील स्थितीनुसार खेळ करण्याची बुद्धी आणि कौशल्य पणास लावून डावपेचांची अंमलबजावणी करतील याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी होती. जर एखाद्या खेळाडूकडे पुरेसे कौशल्य नसेल तर त्याची हकालपट्टी केली गेली पाहिजे. भारतीय संघ भुवनेश्वरकुमारला अचानक मुकला, पण त्यांना उणीव जाणवली नाही. याचे कारण इतर गोलंदाजांना आपली जबाबदारी अचूक ठाऊक होती. 
- अब्दुल रझ्झाक, माजी अष्टपैलू 


​ ​

संबंधित बातम्या